खंडणी प्रकरणातून छोटा राजन मुक्त; व्यावसायिकाकडे मागितले होते २५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 07:47 IST2021-12-05T07:46:49+5:302021-12-05T07:47:08+5:30
मुंबई पोलिसांनी जे पुरावे सादर केले, त्याव्यतिरिक्त सीबीआयने आणखी कोणतेच नवे पुरावे सादर केले नाहीत.

खंडणी प्रकरणातून छोटा राजन मुक्त; व्यावसायिकाकडे मागितले होते २५ लाख
मुंबई : २००२ खंडणीप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याची शुक्रवारी आरोपमुक्तता केली. व्यावसायिक विरेंद्र जैन यांनी केलेल्या तक्रारीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी छोटा राजनच्या नावाने धमकी देत त्यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी छोटा राजन, बंडी पांडे आणि प्रिन्स सिंग यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. राजनला भारतात आणल्यावर फेब्रुवारी २०१८ मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले.
मुंबई पोलिसांनी जे पुरावे सादर केले, त्याव्यतिरिक्त सीबीआयने आणखी कोणतेच नवे पुरावे सादर केले नाहीत. दोन आरोपींना न्यायालयाने आरोपमुक्त केले आहे. राजनला भारतात आणण्यापूर्वीच प्रिन्स आणि बंटीला आरोपमुक्त करण्यात आले आहे. या खंडणी प्रकरणात राजनची थेट भूमिका नाही, असा युक्तिवाद राजनच्या वकिलांनी न्यायालयात केला. त्यावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला की, खंडणी वसूल करण्यासाठी राजनचे नाव वापरले आणि आरोप निश्चित करण्यासाठी हे पुरे आहे. मात्र, न्यायालयाने राजनची या प्रकरणातून आरोपमुक्तता केली.