नवी दिल्ली : सायबर गुन्हे प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने दिल्ली-एनसीआर आणि हरयाणामधील ११ ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत आतापर्यंत १.०८ कोटी रुपये रोख आणि सोने जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सायबर गुन्ह्यांशी संबंधित एका प्रकरणात सीबीआयने ही मोठी कारवाई केली. दिल्ली-एनसीआर आणि हरियाणातील हिसारमधील ११ ठिकाणी छापे टाकले. यावेळी सीबीआयने १.०८ कोटी रुपये रोख, १००० अमेरिकन डॉलर्सचे परकीय चलन आणि २५२ ग्रॅम सोने जप्त केले. याशिवाय, अनेक डिजिटल पुरावे देखील सापडले आहेत, ज्यामध्ये ६ लॅपटॉप, ८ मोबाईल फोन आणि १ आयपॅडचा समावेश आहे.
या कारवाईनंतर सीबीआयकडून भारतीय दंड संहितेच्या कलम १२० बी (कट रचणे), ४२० (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT कायदा) कलम ६६ डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी सरकारी अधिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत होते. ते तांत्रिक सहाय्य (Technical Support) देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होते. तसेच, लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवत होते, असे तपासात समोर आले आहे.
तीन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखलया प्रकरणात सीबीआयने आधीच तीन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्यावर खंडणीचाही आरोप आहे. छाप्यादरम्यान, सीबीआयला आढळून आले की, आरोपी बेकायदेशीरपणे व्हीओआयपी कॉलिंग सिस्टम वापरत होते आणि डार्कनेटद्वारे लोकांची फसवणूक करण्याचे आपले जाळे पसरवत होते. सीबीआय आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. आरोपींनी आतापर्यंत किती लोकांना फसवले आहे आणि त्यांनी किती पैसे लुटले आहेत याचाही तपास केला जात आहे.
देशात वाढतायेत सायबर गुन्हेभारतात सायबर गुन्ह्यांची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आता फसवणूक करणारे नवीन पद्धतीद्वारे लोकांना लुटण्यात व्यस्त आहेत. बनावट कॉल सेंटरद्वारे परदेशी नागरिकांना लक्ष्य केल्याची अनेक प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. गेल्या काही वर्षांत सीबीआय आणि इतर एजन्सींनी अशा अनेक टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे, परंतु सायबर गुन्हेगार फसवणूक करण्याच्या नवीन पद्धती अवलंबण्यापासून थांबत नाहीत.