पुणे : चोरीचा माल खरेदी करत असल्याचा आरोप करत कारवाई न करण्यासाठी भंगार व्यावसायिकाकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना खासगी व्यक्तीसह पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. पोलीस हवालदार निसार मेहमुद खान (वय ४४) आणि मेहंदी अजगर शेख (वय ३२, रा़ हडपसर) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत़. याप्रकरणी एका ४५ वर्षांच्या महिलेने तक्रार दिली होती़. तक्रारदार यांचा हडपसर येथील आनंदनगरमध्ये भंगाराचा व्यवसाय आहे़. पोलीस हवालदार निसार खान याने त्यांच्यावर चोरीचा माल खरेदी करीत असल्याचा आरोप करुन तशा तक्रारी आल्या आहेत, असे सांगितले़. त्यामध्ये कारवाई करायची नसेल व भंगाराचा धंदा पुढे चालू ठेवायचा असेल तर १५ हजार रुपयांची मागणी केली़ .तेव्हा या महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे २४ एप्रिलला तक्रार केली़. तक्रारीची पडताळणी करताना हवालदार खान याने ५ हजार रुपये स्वीकारण्याची तडजोड केली़. त्यानुसार गुरुवारी दुपारी हडपसर येथील ताज फर्निचरजवळ सापळा रचण्यात आला़. खान याच्या सांगण्यावरुन मेहंदी शेख याला पकडण्यात आले़. त्यानंतर खान यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे़. पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, चंद्रकांत चौधरी,सहायक पोलीस उपनिरीक्षक ढवणे, हवालदार शेळके, पोलीस नाईक झगडे, चालक वाळके यांनी या कारवाईत भाग घेतला़.
चोरीचा माल घेतल्याचा आरोप करुन लाच घेणाऱ्या हवालादारासह दोघांना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 15:32 IST
तक्रारदार यांचा हडपसर येथील आनंदनगरमध्ये भंगाराचा व्यवसाय आहे़.
चोरीचा माल घेतल्याचा आरोप करुन लाच घेणाऱ्या हवालादारासह दोघांना पकडले
ठळक मुद्देमहिलेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे २४ एप्रिलला तक्रार