पती-पत्नीचं नातं हे सात जन्माचं मानलं जातं. संकटात एकमेकांची साथ देण्याची शपथ अग्नीसाक्षीने घेतली जाते. पण जेव्हा पतीच कायद्याच्या चिंधड्या उडवून घराला अंमली पदार्थांचा अड्डा बनवतो, तेव्हा पत्नीने काय करावे? इंदूरच्या एका धाडसी पत्नीने या प्रश्नाचं असं उत्तर दिलं आहे, ज्याची सध्या संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे. आपल्या पतीच्या अवैध धंद्याला कंटाळून आणि त्याच्या जाचाला न जुमानता या पत्नीने थेट पोलिसांकडे पुराव्यासह तक्रार केली आणि पतीची रवानगी थेट कोठडीत केली.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारगंज परिसरात राहणारी ही महिला व्यवसायाने अकाउंटंट आहे. तिचा पती बुद्ध किरण हा महालक्ष्मी नगरमध्ये एक मोठे पान दुकान चालवतो. वरकरणी हे दुकान सामान्य वाटत असले तरी, या दुकानाच्या आड तो कॉलेज तरुण आणि हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना गांजा आणि ड्रग्ज्स पुरवण्याचे काळे कृत्य करत होता.
घरालाच बनवलं होतं ड्रग्जचं कोठार
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी बुद्ध किरण हा घराबाहेरच नव्हे तर चक्क घराच्या आत बसून अंमली पदार्थांचे वजन करायचा आणि त्याच्या पुड्या बांधायचा. पत्नीने अनेकदा या कृत्याला विरोध केला, पण प्रत्येक वेळी तिला धमकावून गप्प करण्यात आले. पतीसोबतच सासरच्या मंडळींनीही तिला या प्रकरणात साथ न दिल्याने ती एकाकी पडली होती.
व्हिडिओ बनवला अन् गेम फिरवला!
४ फेब्रुवारी रोजी या वादाने उग्र रूप धारण केले. पत्नीने ड्रग्ज विक्रीला विरोध केला असता, आरोपी पतीने तिला इतकी बेदम मारहाण केली की तिचे डोके फुटले. रक्ताळलेल्या अवस्थेतही ही महिला डगमगली नाही. तिने हुशारीने घरात सुरू असलेल्या या काळ्या धंद्याचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये अंमली पदार्थांची पाकिटे आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा स्पष्ट दिसत होता.
यानंतर वकील डॉ. रूपाली राठोड यांच्या मदतीने तिने थेट पोलीस आयुक्त संतोष सिंह यांची भेट घेतली आणि हा व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला.
पोलिसांची छापेमारी आणि अटक
व्हिडिओ पाहताच पोलीस आयुक्तही चक्रावून गेले. त्यांनी तातडीने लसुडिया पोलीस ठाण्याला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी आरोपीच्या दुकानावर आणि घरावर छापा टाकला असता, तिथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत हा आरोपी कोणत्या सप्लायर्सकडून माल आणत होता, याची माहिती त्याने दिली आहे. आपल्याच पतीचा हा कारनामा उघडकीस आणल्यामुळे या पत्नीचे सगळेच कौतुक करत आहेत.
Web Summary : An Indore woman bravely reported her husband's drug business to the police after he turned their home into a drug den. Despite threats and violence, she gathered evidence, leading to his arrest and sparking widespread praise for her courage.
Web Summary : इंदौर में एक पत्नी ने साहस दिखाते हुए पति के नशा कारोबार की पुलिस में शिकायत की, जब उसने घर को नशे का अड्डा बना दिया। धमकियों और हिंसा के बावजूद, उसने सबूत जुटाए, जिससे उसकी गिरफ्तारी हुई और उसकी बहादुरी की व्यापक प्रशंसा हुई।