बंगळुरू - कर्नाटकातील चिक्कबल्लापूरचे भाजप खासदार के. सुधाकर यांच्या पत्नी प्रीती यांना ‘डिजिटल अरेस्ट’ झाल्याचे भासवून त्यांच्याकडून सायबर भामट्यांनी १४ लाख रुपये उकळले होते. मात्र पोलिसांनी हा प्रकार कळताच तातडीने कारवाई करून संपूर्ण रक्कम परत मिळवली आहे.
ही घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली असल्याचे एखाद्या व्यक्तीला सायबर भामटे भासवितात. आपण पोलिस किंवा तपास यंत्रणेचे अधिकारी आहोत असे ते खोटे सांगतात. त्यासाठी व्हिडीओ काॅल करून संबंधित व्यक्तीला धमकाविले जाते. तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करू, असेही त्यांना सांगण्यात येते. त्यामुळे घाबरलेली व्यक्ती सायबर भामटे मागतील ती रक्कम देण्यास तयार होतात. हे पैसे दिल्याने तुमच्यावरील अटकेची कारवाई रद्द होईल असे हे भामटे सांगतात. अशी प्रकरणे सध्या वारंवार घडत आहेत.
पैसे परत मिळवण्यात यशसायबर फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच प्रीती यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हा व्यवहार झालेली बँक खाती पोलिसांनी तत्काळ फ्रीज केली. त्यानंतर या प्रकरणी ३ सप्टेंबर रोजी न्यायालयाने आदेश दिला की, प्रीती यांची १४ लाखांची रक्कम ज्या बँकेच्या खात्यात वळती झाली ती परत करण्यात यावी. त्यानुसार त्यांना ही रक्कम परत मिळाली आहे.
नेमके काय घडले?प्रीती यांना एक व्हॉट्सअप कॉल आला. मी मुंबई सायबर क्राइमचा पोलीस अधिकारी बोलत आहे असे फोन करणाऱ्याने त्यांना सांगितले. तुमच्या खात्यातून बेकायदेशीररित्या रक्कम वळती झाल्याचा संशय असून त्या व्यवहाराची आता रिझर्व्ह बँकेकडून तपासणी होईल. तुम्हाला ४५ मिनिटांत ती रक्कम परत मिळेल असे प्रीती यांना त्या व्यक्तीने सांगितले. त्यांना १४ लाखांची रक्कम तातडीने एका बँक खात्यात वळती करा, अन्यथा तुम्हाला अटक केली जाईल, अशी धमकीही दिली. प्रीती यांनीही एका बँकेच्या खात्यात ही रक्कम वळती केली.