पडद्याआड सुरू असलेला इलेक्ट्रॉनिक्स चकरी सोरटाचा डाव उधळला, तिघे जण ताब्यात
By विजय.सैतवाल | Updated: October 9, 2023 21:15 IST2023-10-09T21:15:15+5:302023-10-09T21:15:39+5:30
४५ हजाराच्या रकमेसह संगणक व इतर साहित्य जप्त

पडद्याआड सुरू असलेला इलेक्ट्रॉनिक्स चकरी सोरटाचा डाव उधळला, तिघे जण ताब्यात
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: सिंधी कॉलनीतील भाजीपाला मार्केटमधील पडदा लावलेल्या एका दुकानात संगणकावर सुरू असलेला चकरी सोरट जुगारचा खेळ पोलिसांनी उधळून लागला. या ठिकाणाहून तीन जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणाहून रोख रकमेसह संगणक व इतर साहित्य जप्त केले. पैसे घेऊन उभे असलेले ग्राहक मात्र पसार झाले. ही कारवाई सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली.
उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना सिंधी कॉलनीमध्ये भाजीपाला मार्केटमधील एका दुकानामध्ये संगणकावर चकरी फिरवून त्यावर आकडे व पैसे लावून चकरी सोरट जुगाराचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या वेळी त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार परीविक्षाधीन उप विभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी, उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोकॉ गोपाळ पाटील, सचिन साळुंखे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोउनि दत्तात्रय पोटे, सचिन पाटील, पोलिस नाईक, योगेश बारी सिंधी कॉलनीतील संबंधित दुकानात पोहचले. तेथे दुकानात तीन जण टीव्ही स्क्रीनवर गोल चकरी माऊसच्या आधारे ऑपरेट करीत असताना तर चार ते पाच जण हातात पैसे घेवून उभे असल्याचे आढळून आले. पैसे घेवून उभे असलेले इसम पोलिसांना पाहून पळून गेले. टीव्ही स्क्रीन ऑपरेट करणारे संतोष नानकराम रामचंदाणी (३२, कंवर नगर), वसीम शहा शब्बीर शहा (३२, रा, तांबापुरा), नीलेश दिनेश सरपटे (३३, नवल कॉलनी) यांना ताब्यात घेतले. तसेच त्या ठिकाणाहून रोख रकमेसह सीपीयू, मॉनिटर, की बोर्ड, माऊस असा एकूण ४७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोकॉ सचिन साळुंखे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.