उत्तर प्रदेशातील कानपूरमधून हुंड्यासाठी क्रूरतेचा कळस गाठल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे सासरच्या लोकांनी सुनेला मारहाण करून एका खोलीत डांबले आणि त्यानंतर त्या खोलीत विषारी साप सोडून दिला. महिलेच्या ओरडण्यानेही कोणाचे हृदय पाझरले नाही. सापाने दंश केल्याने ती महिला गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हुंड्यासाठी छळ, गाठला क्रूरतेचा कळसकानपूरच्या कर्नलगंज भागात ही अमानुष घटना घडली आहे. चमनगंज येथील रहिवासी रिजवाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची बहीण रेशमा हिचे लग्न १९ मार्च २०२१ रोजी शाहनवाज खान उर्फ अयानसोबत झाले होते. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस चांगले होते. पण, काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी पैशांची मागणी सुरू केली. त्यांनी सुरुवातीला २ लाख रुपये मागितले, त्यापैकी रेशमाच्या कुटुंबाने १.५ लाख रुपये दिले. पण त्यांची हाव वाढतच गेली आणि त्यांनी थेट ५ लाख रुपयांची मागणी केली.
खोलीत कोंडून सोडला सापरिजवाना यांच्या आरोपानुसार, रेशमाचा पती अयान, सासू शमशाद बेगम, सासरे उमर, दीर इमरान आणि नणंद आफरीन, अमरीन, समरीन यांनी रेशमाला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. १९ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी रेशमाला तिच्या लहान मुलीपासून वेगळे करून एका खोलीत डांबले. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता रेशमाच्या बिछान्यावर एक काळा साप दिसला, ज्याने तिच्या पायाला दंश केला होता. रेशमाच्या किंकाळ्या ऐकून सासरच्या लोकांनी दरवाजा उघडला, त्यावेळी ती कशीतरी तिथून पळून माहेरी पोहोचली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखलया घटनेनंतर, पोलिसांनी रिजवाना यांच्या तक्रारीनुसार पतीसह ७ सासरच्या लोकांविरोधात विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये महिलेसोबत क्रूरता, अमानुषपणे मारहाण, आणि निष्काळजीपणामुळे जीवन धोक्यात आणल्याचा आरोप आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, पीडित महिलेवर उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती सुधारल्यावर तिचा जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाईल.