तिरुवनंतपुरम - केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील बालारामपूरम इथं नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यातील आरोपीचा कबुली जबाब ऐकून पोलीसही हैराण आहेत. सख्या बहिणीवर वाईट नजर ठेवणाऱ्या भावाने अडीच वर्षाच्या भाचीची हत्या केली आहे. आरोपी भाऊ बहिणीवर एकतर्फी प्रेम करत होता, तिच्याशी संबंध ठेवायची इच्छा होती. मात्र या संबंधात भाची वाटेत अडथळा असल्याचं मानत त्याने तिला विहिरीत ढकलून दिले. आरोपी मामानं भाचीच्या हत्येची कबुली दिली मात्र पोलिसांना त्याच्यावर विश्वास बसत नाही.
माहितीनुसार, बहीण तिच्या अडीच वर्षाच्या मुलीसह माहेरी राहत होती. ती राज्यातील एका देवस्थान संस्थानमध्ये काम करायची. तिचा पती सुपरमार्केटमध्ये कामाला होता. काही दिवसांपासून हे जोडपे वेगळे राहत होते. अलीकडेच आरोपीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणीचा नवरा सासरी आला होता. गुरुवारी वडिलांवर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. त्याचवेळी ७ च्या सुमारास अडीच वर्षाची मुलगी बेपत्ता झाली. बहीण आणि तिच्या पतीने सर्व नातेवाईकांकडे चौकशी करत अखेर पोलिसांना मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
पोलिसांच्या शोधानंतर घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी या प्रकरणी आई वडील आणि नातेवाईकांची चौकशी सुरू केली तेव्हा मुलीची आई आणि मामा यांच्या जबाबात विरोधाभास आढळला. तपासावेळी आरोपी हरिकुमारने त्याचा गुन्हा कबुल केला. तो बहिणीवर एकतर्फी प्रेम करत असून त्यातून त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली. सध्या याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली असून आणखी वेगवेगळे अँगल यात शोधले जात आहेत.
पोलिसांना शंका, कहाणीत ट्विस्ट?
दरम्यान, आरोपी मामाने पोलिसांना कबुली दिली असली तरी पोलिसांना विश्वास बसत नाही. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. माहितीनुसार, कुटुंब आर्थिक संकटातून जात होते, ज्यादिवशी ही घटना घडली तेव्हा सकाळी आरोपी हरिकुमारच्या खोलीला आग लागली होती त्यामुळे रहस्य वाढले आहे. या प्रकरणी वेगळं काही लपवलं जातंय अशी शंका पोलिसांना आहे. ज्यातून मुलीच्या हत्येचं खरे कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलीस मृत मुलीच्या आईचेही व्हॉट्सअप चॅट तपासत आहे. शुक्रवारी आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलीच्या आईला पोलीस पुन्हा चौकशीला बोलवणार आहेत.