अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २६ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. सुनावणीदरम्यान यातील एक आरोपी नितीन गौतम सप्रे याने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना सप्रे यांनी दावा केला की, त्याला न्यायालयीन कोठडीतून बोरिवली पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि त्याच्याकडून जबरदस्तीने कबुलीजबाब घेण्यात आला.
सप्रेने पुढे आरोप केला की, जर त्याने कबूल करण्यास नकार दिला तर ते त्याच्या कुटुंबालाही या प्रकरणात गोवतील, अशी धमकी पोलिसांनी दिली. माझ्यावर कबूल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि पोलिसांनी सहकार्य केलं नाही, तसेच माझ्या कुटुंबाला अटक केली जाईल अशी धमकी देखील मला देण्यात आली.
नितीन गौतम सप्रेने त्यावेळी दिलेला कबुलीजबाब मागे घेण्याची इच्छा व्यक्त करत जेलमधून न्यायालयात अर्ज दाखल करण्याची तयारीही केली आहे. सप्रेचे वकील अजिंक्य मधुकर मिरगल आणि ओंकार इनामदार यांनी त्याचा जबाब मागे घेण्यासाठी अर्ज दाखल करणार असल्याची पुष्टी केली.
वकील मिरगल यांनी या प्रकरणाबाबत बोलताना सांगितलं की, सप्रेने दावा केला आहे की, तो अनमोल बिश्नोईच्या संपर्कात असल्याची कबुली न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर देण्याची त्याला धमकी देण्यात आली होती आणि त्याने या प्रकरणातील दोन आरोपींना माहिती दिली होती. त्याला सांगण्यात आलं की, जर त्याने तसं केलं नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जेलमध्ये टाकलं जाईल.