एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांच्या वडिलांना आता त्यांच्या नातवाची काळजी वाटू लागली आहे. सून निकिता हिला गुरुग्राममधील मार्केटमधून अटक केल्यानंतर त्यांनी भावनिक आवाहन केलं आहे. माझ्या मुलाला मारलं, आता नातवाला तरी परत करा, असं सांगितलं. मुलगा आणि सुनेमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. घटस्फोट घेण्यासाठी सून निकिताने २० लाख रुपयांची मागणी केली होती असंही वडिलांनी म्हटलं आहे.
२०२१ मध्ये ही रक्कम देण्याचंही त्यांनी मान्य केलं होतं, परंतु नंतर पुढे काही झालं नाही. त्यावेळी घटस्फोट झाला असता तर आज त्यांचा मुलगा जिवंत असता. दुसरीकडे, कर्नाटक पोलिसांनी दावा केला आहे की, निकिता अटक टाळण्यासाठी गुरुग्रामच्या सेक्टर-५७ येथील मार्केटमध्ये लपून बसली होती. सध्या कर्नाटक पोलिसांनी निकिता, त्याची आई, भाऊ आणि काका यांना अटक केल्यानंतर स्थानिक न्यायालयात हजर केलं.
कर्नाटक पोलिसांचं एक पथक अजूनही जौनपूर ते बनारसपर्यंत फिरत आहे. हे पोलीस पथक निकिताच्या बँक अकाऊंटपासून ते लग्नाच्या ठिकाणापर्यंत सर्व गोष्टींचा तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बरेच पुरावे मिळाले आहेत. एआय इंजिनिअर अतुल सुभाष याने ८० मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर आत्महत्या केली होती.
अतुल सुभाषचा मृतदेह बंगळुरू येथील मंजुनाथ लेआउट येथील फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. 'जस्टिस इज ड्यू' असंही लिहिलं होतं. आपल्या मृत्यूसाठी त्याने पत्नी, सासू, मेहुणा आणि सासरच्या काही लोकांना जबाबदार धरलं होतं. निकिताला अतुलकडून पैसेही घ्यायचे होते आणि केसही लढत राहायचं होतं.
नातू अजूनही निकिताच्या ताब्यात असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. मुलगा गेला आहे, आता फक्त नातू परत आला पाहिजे असं म्हटलं. बंगळुरूचे डीसीपी व्हाइट फील्ड डिव्हिजन शिवकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूला पोहोचल्यानंतर आरोपींची चौकशी केली जाईल. यावेळी अतुल सुभाषच्या आत्महत्येच्या व्हिडीओमध्ये करण्यात आलेले सर्व आरोप समोर येणार आहेत. या व्हिडिओमध्ये पत्नी आणि तिच्या कुटुंबाशिवाय अतुलने कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले होते.