कुऱ्हा (तळणी) (यवतमाळ) : गावातील राजकारण कोणत्या टोकाला जाईल याचा नेम नाही. परंपरागत वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी चक्क विरोधकाच्या घराभोवती तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडण्यात आला. यात ३७ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती थोडक्यात बचावला. ही घटना आर्णी तालुक्यातील अंजी नाईक येथे शनिवारी पहाटे २.३० वाजता घडली.
सविता मनेश पवार (३७) असे मृत महिलेचे नाव आहे. महिला तिचा पती आणि दोन मुले घरात शुक्रवारी रात्री जेवण करून झोपी गेले. बाथरुम घराबाहेर असल्याने पहाटे २.३० वाजता सविता उठली. घराबाहेर पडल्यानंतर चप्पल घालत असतानाच अचानक जागेवर कोसळली. आवाज आल्याने पती मनेश बाहेर आला. त्यालाही जोरदार विजेचा धक्का बसला. आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी दोघांनाही आर्णी रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी सविताच्या उजव्या हाताला वीज तारेचा स्पर्श होवून मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.
मनेश देवराव पवार याच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी इंदल मोतीराम राठोड (४७), सुदाम जयराम चव्हाण (६५), गणेश केशव राठोड (५९), विनोद रामकृष्ण चव्हाण (४८), राजू कवडू जाधव (३५) , चेतन निवृत्ती चव्हाण (२८) या सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, ३ (५) नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर घाटंजी पोलिसांनी संशय असलेल्या दोघांना ताब्यात घेतले.
ठाणेदार, एसडीपीओ तळ ठोकून
धक्कादायक प्रकार घडल्यामुळे अंजी नाईक येथे काही काळ तणावाची स्थिती होती. पांढरकवडा एसडीपीओ आणि घाटंजी ठाणेदार केशव ठाकरे शनिवारी सकाळपासूनच गावात तळ ठोकून होते. येथे पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. सविताच्या मृतदेहाची यवतमाळ येथे वैद्यकीय चिकित्सा करण्यात आली. सायंकाळी तिच्या पार्थिवावर अंजी नाईक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.