बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लामबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी शरीफुलला ठाण्यातून अटक केली. त्याच्यावर चोरीच्या उद्देशाने सैफच्या फ्लॅटमध्ये घुसल्याचा आणि अभिनेत्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने बांगलादेशातील शरीफुलच्या कुटुंबाशी संपर्क साधला आहे. त्यांनी बांगलादेशमध्ये असलेल्या आरोपीची वडील रुहुल अमीन फकीर यांच्याशी संवाद साधला आहे. शरीफुलचं कुटुंब बांगलादेशातील झालोकाठी येथे राहतं. सैफवर हल्ला केल्यानंतर काही तासांनी आरोपीने आपल्या वडिलांना फोन केला होता. त्या कॉल दरम्यान त्याने वडिलांना सांगितलं की, वडिलांच्या खात्यात १०,००० ट्रान्सफर केले आहेत. त्याच्याकडे आता तीन हजार शिल्लक आहेत. ते त्याला पुरेसे आहेत..
रुहुल अमीन फकीर यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, ते एका जूट कंपनीत क्लार्क म्हणून काम करतात. घटनेच्या दोन दिवसांनंतर, त्यांनी त्यांच्या मुलाचा फोटो मीडिया आणि सोशल मीडियावर पाहिला. माझा विश्वासच बसत नव्हता. आमच्याकडे कोणतंही मोठे आर्थिक संकट नाही. आमच्यापैकी कोणीही असा गुन्हा करण्याचा विचारही करू शकत नाही असं म्हटलं आहे.
आता वडिलांना काळजी वाटत आहे की, ते आपल्या मुलाला कायदेशीर मदत कशी करू शकतील. तो त्यांच्यापासून हजारो किलोमीटर दूर आहे. शरीफुलने दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. तो गेल्या वर्षी एप्रिलमध्ये एका दलालाच्या मदतीने भारतात दाखल झाला. तो चांगल्या नोकरीच्या शोधात भारतात आला होता.
रुहुल यांनी सांगितलं की, शरीफुल भारतात जाण्यापूर्वी गावात छोटासा व्यवसाय करायचा. बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे त्याला असं वाटू लागलं की, येथे त्याच्यासाठी रोजगार नाही. या कारणास्तव, तो सर्वप्रथम एका दलालामार्फत पश्चिम बंगालला गेला. मग तो तिथे एका हॉटेलमध्ये काम करू लागला. त्यानंतर तो मुंबईला गेला. तिथेही त्याने अनेक हॉटेल्समध्ये काम केलं. तो नियमितपणे घरी फोन करायचा. त्याच्या कुटुंबात त्याचे आईवडील, त्याची पत्नी आणि दोन मुलं आहेत.