Bihar Crime News: बिहारमध्ये सध्या विधानसा निवडणुकीची धूम सुरू आहे. अशातच, राज्यातील सीवान जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दरौंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (एएसआय) अनिरुद्ध कुमार यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी हत्येनंतर त्यांचा मृतदेह एका ओसाड जागी फेकून दिला. या घटनेने केवळ पोलिस दलच नव्हे, तर संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिरसा नवका टोला गावात स्थानिकांना सकाळी मृतदेह दिसला, त्यानंतर लगेच पोलिसांना कळविण्यात आले. दरौंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करुन तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की, एएसआय अनिरुद्ध कुमार काल रात्री काही वैयक्तिक कामानिमित्त सिव्हिल कपड्यांमध्ये बाहेर गेले होते. त्याच वेळी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला आणि धारदार शस्त्राने हत्या केली. पोलिसांच्या मते, हल्ला अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आला असून, ही एक पूर्वनियोजित घटना असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
या घटनेने संपूर्ण पोलिस विभागात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आणि लवकरात लवकर आरोपींचा मागोवा घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. आसपासच्या सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क केले गेले असून सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत. पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, दोषींना लवकरच गजाआड केले जाईल.
या हत्येमुळे स्थानिकांमध्येही तीव्र संताप आहे. नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की, जर पोलिस अधिकारीच सुरक्षित नसतील, तर सामान्य जनता कशी सुरक्षित राहणार? लोकांनी सरकारकडे आणि प्रशासनाकडे दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच, एकीकडे भाजप आणि नितीश कुमारांचे सरकार आरजेडी-काँग्रेसवर जंगलराजचा मुद्दा उपस्थित करत टीका करतात, तर दुसरीकडे याच सरकारच्या काळात गुन्हेगारांना अभय मिळतंय का? असा प्रश्न या घटनेवरुन विचारला जातोय.