आशुतोष भाकरेवर सुरू होते मानसोपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 05:22 AM2020-07-31T05:22:47+5:302020-07-31T05:22:59+5:30

सुसाईड नोट नाही; महिनाभरापूर्वी आला नांदेडला

Ashutosh Bhakre was taking Psychological treatment | आशुतोष भाकरेवर सुरू होते मानसोपचार

आशुतोष भाकरेवर सुरू होते मानसोपचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नवोदित कलावंत आशुतोष भाकरे (३२) याच्या आत्महत्या प्रकरणी अद्याप कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत़ मोठ्या बॅनरची कामे मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते. त्यामुळे मुंबईत मानसोपचार तज्ज्ञाचा सल्लाही त्याने घेतला होता. उपचार सुरू असतानाच त्याने बुधवारी मृत्यूला कवटाळले. पोलीस अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत आलेले नाहीत.


‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली आघाडीची अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती असलेल्या आशुतोषने २९ जुलैला दुपारी येथील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली़ साडेचार वर्षांपासून तो मुंबई येथेच राहायचा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागील महिन्यात तो नांदेडला परतला होता. याबाबत नातेवाइकांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांत कोणतेही नवीन काम त्याला मिळालेले नव्हते. यातून काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. या अनुषंगाने मुंबई येथे मानसोपचार तज्ज्ञाकडून सल्ला घेण्यात आला होता. त्यानुसार उपचारही सुरू होते. आशुतोषने ‘विचार ठरला पक्का’, ‘भाकर’ या चित्रपटात काम केले होते़ तसेच शॉर्टफिल्ममध्येही त्याची भूमिका होती़


आकस्मिक मृत्यूची नोंद
या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून शिवाजीनगर पोलिसांनी नोंद घेतली आहे. कसलीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आशुतोष हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता, एवढीच माहिती कुटुंबीयांकडून मिळाल्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले.

Web Title: Ashutosh Bhakre was taking Psychological treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.