मित्राला फसविणाऱ्या लहू जाधवचा अनेकांना कोट्यावधीला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 13:04 IST2018-07-18T13:03:32+5:302018-07-18T13:04:53+5:30
भागीदारीच्या आडून लाखोंचा गंडा घालणाऱ्या आणि सध्या अटकेत असलेल्या लहू उत्तम जाधव याने अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे.

मित्राला फसविणाऱ्या लहू जाधवचा अनेकांना कोट्यावधीला गंडा
औरंगाबाद : भागीदारीच्या आडून लाखोंचा गंडा घालणाऱ्या आणि सध्या अटकेत असलेल्या लहू उत्तम जाधव (४०, रा. बीड बायपास) याने अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. जाधवविरोधात गुन्हे शाखेकडे फसवणुकीच्या आणखी तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत.
अंकित मुथियान यांना सुमारे ६२ लाख रुपयांना फसविल्यावरून जाधव सध्या पोलीस कोठडीत आहे. मंगळवारी औरंगाबादमधील संतोष तायडे (रा. शिवाजीनगर) आणि अर्जुन साळुंके (रा. एन-३ सिडको) या दोघांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांची भेट घेऊन जाधव याच्याविरुद्ध तक्रार दिली. संतोष तायडे याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जाधव याने कर्नाटकमध्ये चालू असलेल्या १७ कोटी रुपयांच्या रेल्वेमार्गाच्या कामामध्ये भागीदारी देतो म्हणून तायडे यांच्याकडून ११ लाख, तर साळुंके यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले होते. मात्र, या दोघांना भागीदारीतील रक्कम तर दिली नाहीच. मात्र, या दोघांकडून घेतलेली रक्कमही परत केली नाही.
शैक्षणिक तसेच घरखर्चासाठी साळुंके हा सध्या टॅक्सी चालवून घरगाडा चालवीत आहे. अपघातामुळे त्याला अपंगत्व आले आहे. दोन्ही तक्रारींची गुन्हे शाखा छाननी करीत असून, चौकशी झाल्यानंतर गुन्हा दाखल होईल, असे मधुकर सावंत यांनी सांगितले. दरम्यान, लहू जाधव याने गुजरातमध्येही काही जणांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. जाधवविरूद्ध तक्रारी असल्यास पोलिसांकडे देण्याचे आवाहन केले
आरटीओमध्ये सूत्रधार
औरंगाबादेतील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकाशी लहू जाधव याचे चांगले संबंध आहेत. तोच कंपनीत भागीदार म्हणून गुंतवणूकदार शोधून जाधवकडे पाठवितो. तोच यामागचा मुख्य सूत्रधार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.