अंगणवाडी सेविका सामूहिक अत्याचार प्रकरण : प्रकृती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:03 IST2020-02-12T00:02:41+5:302020-02-12T00:03:53+5:30
धानोरा तालुक्यातील अंगणवाडी सेविकेवर झालेल्या सामूहिक अत्याचार पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोमवारी रात्री उशिरा त्या महिलेला गडचिरोली जिल्हा रुग्णालयातून नागपूरच्या मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले.

अंगणवाडी सेविका सामूहिक अत्याचार प्रकरण : प्रकृती गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धानोरा तालुक्यातील अंगणवाडी सेविकेवर झालेल्या सामूहिक अत्याचार पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोमवारी रात्री उशिरा त्या महिलेला गडचिरोली जिल्हा रुग्णालयातून नागपूरच्या मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. मंगळवारी या महिलेवर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली.
सात फेब्रुवारी रोजी अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक असलेल्या गावी आपल्या कर्तव्यावर दुचाकीने जात असताना आरोपींनी तिला रस्त्यात अडविले. जीवे मारण्याची धमकी देऊन धानोरा तालुक्यातील रेखाटोला ते फुलबोडी गावादरम्यानच्या जंगलात नेले. दोघांनीही आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. यावेळी तिच्या डोक्यावर गंभीर दुखापत करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. तेवढ्यात एक गुराखी महिला तिथे पोहोचली. त्या गुराखी महिलेला बघताच पीडित महिलेला त्याच अवस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला. या घटनेची तक्रार कारवाफा पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डोक्यावरील जखम खोल असल्याने व पीडितेची प्रकृती गंभीर होत असल्याने पुढील उपचारासाठी मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाठविले. येथील डॉक्टरांनुसार पीडितेची प्रकृती स्थिर असली तरी गंभीर आहे. तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.