लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारितील दक्षिणा विभागाच्या एका केंद्रातील अधिकाऱ्याने केलेल्या २ कोटी २४ लाख रुपयांच्या घोटाळाप्रकरणी सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी संबंधित विभागाच्या दक्षता विभागाचे मुख्य अधिकारी के. के. गोपालकृष्णन यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे.
दाखल तक्रारीनुसार, या केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या जीएमएन पिल्लई या अधिकाऱ्याने २०१९ ते २०२३ या कालावधीमध्ये या विभागासाठी दिलेल्या निधीचा अपहार करत तो निधी त्याच्या नातेवाइकांच्या कंपन्यांमध्ये वळवला. या केंद्रातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी जी कंत्राटे काढली जातात, त्यामध्ये ज्या कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या त्या पिल्लई याच्याच नातेवाइकांच्या कंपन्या होत्या. त्यामुळे त्यांनाच या निविदा मिळाल्या होत्या. त्यामुळे पिल्लईने या मार्गाने भ्रष्टाचार केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला असून, आता सीबीआय या प्रकरणी चौकशी करत आहे.