मुंबई - सगळं काही अक्षय शिंदेंला न्याय मिळण्याच्या बाजूने प्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी त्याचे आई वडील माघार घेतायेत. यात पुढे कुणाला धोका असू शकतो हे शोधायला हवं. सध्या त्याच्या आई वडिलांना कुणाचा धोका आहे. हे सर्व काही मी कोर्टात मांडणार आहे. थोडे थांबा, यातीलही अनेक आका बाहेर येतील. या प्रकरणात नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे हे सर्वांनाच दिसून येतंय असं बदलापूर एन्काऊंटर प्रकरणातील अक्षय शिंदे यांचे वकील अमित कटारनवरे यांनी सांगितले.
आज बदलापूर प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर अक्षय शिंदेंच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अमित कटारनवरे म्हणाले की, एन्काऊंटर प्रकरणात एडीएसची चौकशी पोलीस करतायेत. त्याचा अहवाल एफआयआरमध्ये होऊ शकत नाही. अक्षय शिंदेविरोधात तपास सुरू आहे असं राज्य सरकारच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले. मग आम्ही त्यावर साधा प्रश्न विचारला तपास करून खटला कुणाविरोधात चालवणार मेलेल्या माणसाविरोधात? न्यायाधीशांनी जो अहवाल दिलाय, संबंधितांवर गुन्हा दाखल होणार की नाही हे प्रश्न आम्ही कोर्टात उपस्थित केले असं त्यांनी सांगितले.
तसेच मागील सुनावणीत आम्हाला वकील नको असं आई वडिलांकडून खोटं लिहून घेतले, वकील बदलायला दबाव टाकला. त्यानंतर त्यांनी समोर येऊन वकील बदलायचं आमचं म्हणणं नाही. संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही असं अमित काटरनवरे यांनी म्हटलं. आजच्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सुरूच राहणार असल्याचं सांगितले. २४ फेब्रुवारीला याबाबत सुनावणी होईल. अक्षय शिंदेच्या आई वडिलांना कोर्टात हजर राहण्याची गरज नाही असं कोर्टाने सांगितले. तर आई वडिलांनी माघार घेतली तरी आम्ही लढा सुरूच ठेवणार असं वकील अमित कटारनवरे यांनी म्हटलं.
दरम्यान, अक्षय शिंदे प्रकरणात त्याच्या आई वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु गुरुवारी अक्षयच्या आई वडिलांनी आम्हाला खटला लढवायचा नाही. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही असं अक्षय शिंदेंच्या आई वडिलांनी म्हटलं होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने ही सुनावणी सुरूच राहणार असून पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला होणार आहे.