अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने १३ वर्षांनंतर एका तरुणावर चाकूने हल्लाही केला. १३ वर्षांपूर्वी महिलेच्या या व्यक्तीसोबत ठरलेला साखरपुडा मोडला होता. आता महिलेने तरुणावर हल्ला केला आणि विचारलं की, तू माझ्याशी का बोलत नाहीस आणि माझा नंबर का ब्लॉक केलास? महिलेने त्याच्या पोटावर, कंबरेवर आणि पाठीवर चाकूने तीन वार केले. यावेळी त्या तरुणाने कसा तरी आपला जीव वाचवला आणि पळून गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना घडली. जय नावाचा एक तरुण त्याच्या बाईकवरून कुठेतरी जात होता. त्याच क्षणी अचानक रिंकी नावाच्या महिलेने जयच्या बाईकला धडक दिली. यानंतर, तिने रागाने त्या तरुणाला तो तिच्याशी का बोलत नाही, त्याने तिचा नंबर का ब्लॉक केला हे विचारायला सुरुवात केली. यावरुन महिलेने तरुणावर चाकूने हल्ला केला.
१३ वर्षांपूर्वी रिंकीशी होणार होता साखरपुडा
चाकूच्या हल्ल्यात जखमी झालेला जय आपला जीव वाचवण्यासाठी पळाला. त्याने एका वाहनाकडे लिफ्ट मागितली आणि घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर त्याने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. जय हा अहमदाबादच्या शेला भागातील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याचं १३ वर्षांपूर्वी रिंकीशी साखरपुडा होणार होता. यानंतर काही कौटुंबिक वादांमुळे हा साखरपुडा मोडला. २०१६ मध्ये जयने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. रिंकीचंही लग्न झालं.
संतापलेल्या रिंकीने केला हल्ला
गेल्या वर्षी रिंकीने अचानक जयला फोन केला आणि म्हणाली की जर त्यांचं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. यानंतर, तिने संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण जयने नकार दिला. तरीही रिंकी त्याला सतत फोन करत राहिली. काही वेळाने तिने जयला सांगितलं की तिच्या पतीला त्यांच्या फोन कॉल्सबद्दल कळलं आहे. यानंतर, जयने तिचा नंबर ब्लॉक केला आणि तिचा फोन उचलणं बंद केलं. यामुळे संतापलेल्या रिंकीने त्याच्यावर हल्ला केला.