अहमदाबादच्या सायबर गुन्हे शाखेने एका चिनी गँगला इंडियन बँक अकाऊंट्स पुरवणाऱ्या गँगचा पर्दाफाश केला आहे. सायबर क्राईमने एकूण ११ गुन्हेगारांना अटक केली आहे. ही गँग बनावट आधार कार्डच्या मदतीने बँक अकाऊंट उघडत असे आणि सायबर फसवणुकीचे पैसे लाँड्रिंग करण्यासाठी चिनी गँगपर्यंत बँक अकाऊंट पोहचवण्यास मदत करत असे.
सायबर क्राईमने ५ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील चांदखेडा येथील एका फ्लॅटवर छापा टाकून ९ जणांना अटक केली आहे. राजस्थानमधून २ जणांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान, पोलिसांनी ४३ एटीएम कार्ड, २१ चेकबुक, १० पासबुक, १५ मोबाईल फोन, १२ पॅन कार्ड, १० आधार कार्ड, १ पिस्तूल आणि ७ काडतुसे जप्त केली. गेल्या १० दिवसांतच या गुन्हेगारांच्या बँक खात्यांमध्ये ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार आढळून आले आहेत.
अहमदाबाद सायबर क्राईम ब्रांचच्या डीसीपी लविना सिन्हा म्हणाल्या की, "देशातील २१ राज्यांमध्ये आरोपींविरुद्ध १०९ पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये बँक अकाऊंट्स वापरली गेली आहेत. या गुन्हेगारांच्या नावाने २६ स्वतंत्र बँक अकाऊंट्स उघडण्यात आली होती."
ते पुढे म्हणाले की, गेल्या ४ महिन्यांपासून या बँक अकाऊंटचा वापर इन्वेस्टमेंट फ्रॉड, डिजिटल अरेस्ट, टास्क फ्रॉड आणि टेलीग्राम फ्रॉडसाठी केला जात होता. यापैकी मुख्य आरोपी अनिल आणि सुरेश बिश्नोई हे राजस्थानमध्ये राहणारे त्यांचे मित्र, नातेवाईक आणि ग्रामस्थांना गुजरात आणि महाराष्ट्रात आणत असत.
या गँगचा मास्टर माइंड कुलदीप आहे, तो इतर दोन मास्टर माइंड अभिषेक आणि सुनील यांच्या संपर्कात होता. हे तिघे चिनी गँगच्या संपर्कात होते. १९ वर्षीय सुरेश आणि २० वर्षीय अनिल बिश्नोई हे गेल्या चार महिन्यांपासून २०,००० रुपयांच्या कमिशनवर बँक अकाऊंट देत होते.