मुंबई: दुकान फोडायचे, रोकड उचलायची आणि मग थेट शिर्डी गाठून साईबाबांच्या चरणी दान ठेवायचे... असा भन्नाट फॉर्म्युला वापरणाऱ्या दोन तरुण चोरट्यांना काळाचौकी पोलिसांनी अवध्या २४ तासांत गजाआड केले. रोहित खांडागळे (वय १९, रा. शिवडी) आणि आदित्य प्रसाद (१९, रा. परळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चोरीनंतर दोघे साईबाबा मंदिर परिसरात आश्रय घेऊन चोरलेल्या पैशातील काही हिस्सा मंदिरात दान करायचे, अशी कबुली चोरट्यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ८ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे शिवडी येथील राम टेकडी परिसरातील निरंकार जनरल स्टोअर फोडण्यात आले. तक्रारदार श्यामसुंदर सेवालाल गुप्ता (५५) यांनी रात्री साडेअकराच्या सुमारास दुकान बंद केले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता शटर एका बाजूने उचकटलेले दिसले. तसेच ड्रॉवरमधील ३३ हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे आढळले. याप्रकरणी सकाळी १० वाजता काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
७० सीसीटीव्हींचे फुटेज तपासले
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल चव्हाण यांनी घटनास्थळाभोवतीच्या ५०० मीटर परिसरातील तब्बल ५० ते ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात दोन संशयित तरुण कॅमेऱ्यात कैद झाले. हे दोघेही सराईत चोर असल्याचे तपासात समोर आले.
अशा आवळल्या मुसक्या
मोबाइल सव्हॅलन्स व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचे लोकेशन शिर्डीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने शिर्डीत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल खांडेकर यांच्याशी संपर्क साधून रिअल-टाइम लोकेशन शेअर केले. अखेर ९ डिसेंबर २०२५ रोजी साई संस्थान भवन कैंटीन परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. चोरीला गेलेली रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.