Delhi Crime: शाळेमध्ये क्षुल्लक कारणांवरुन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना होण्याची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. या प्रकरणांमध्ये काहीवेळा विद्यार्थ्यांचा जीवसुद्धा गेला आहे. विद्यार्थिनींच्या गटांमध्येही अशा प्रकारच्या घटना वाढल्याचे पाहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार दिल्लीत पाहायला मिळाला. दिल्लीत मुलींच्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात एका विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मुलींच्या एका गटाने विद्यार्थिनीवर ब्लेडने (पेपर कापण्याचे कटर) सपासप वार केले. यामुळे मुलीच्या चेहऱ्यावर ५० टाके पडले आहेत.
दिल्लीच्या अमन विहार परिसरातील शाळेत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी, एका विद्यार्थिनीने तिच्या बहिणीसह आणि इतर दोन विद्यार्थीनीसह मिळून बारावीच्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आणि कंबरेवर ब्लेडने हल्ला केला. यामुळे पीडितेच्या चेहऱ्यावर आणि कंबरेवर ५० हून अधिक टाके घालावे लागले. हल्ला करणारी विद्यार्थिनी पीडितेच्या शाळेतीलच विद्यार्थीनी आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, किरकोळ वादातून मुलीवर हल्ला करण्यात आला आहे. सीसीटीव्हीमध्ये ही सर्व घटना कैद झाली असून मुलींनी केलेल्या हल्ल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या पीडितेची प्रकृती स्थिर असली तरी तिला जबर मानसिक धक्का बसला आहे. शिक्षक दिनी पीडिता आणि त्याच शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थीनींमध्ये भांडण झाले होत. या भांडणानंतर, हल्लेखोर विद्यार्थीनीने तिच्या काही मैत्रिणींसह हा हल्ला करण्याचा कट रचला, ज्यामध्ये शाळेतील आणि बाहेरील मुली होत्या.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडिता तिच्या मैत्रिणींसह शाळेतून घरी जात असताना, दुसऱ्या शाळेतील काही मुलींनी पीडितेला अडवले. सुरुवातीला वाद झाला आणि त्यानंतर हाणामारी झाली. त्यानंतर, एका मुलीने पीडितेला मागून चेहऱ्याला धरत तिच्यावर ब्लेडने हल्ला केला. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आणि कंबरेवर खोल जखमा झाल्या. हल्ला करणाऱ्या मुलींचे वय १४ ते १५ वर्षांच्या दरम्यान आहे. शिक्षक दिनी झालेल्या वादाचा सूड घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. पीडितेने सांगितले की, या मुलींनी यापूर्वीही तिचा छळ केला होता, पण तिने याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, या घटनेच्या दोन दिवसांनंतर पीडितेच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. मात्र पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, निष्काळजीपणा दाखवला आणि धमकावण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा आरोप आहे.