सध्या ऑनलाईन गेमिंगची क्रेझ खूप वाढली आहे, पण अनेकदा ही सवय मोठे आर्थिक नुकसान घडवते. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका तरुणाने ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनापायी आपल्याच घरात चोरी केली.
ही घटना बालाघाट जिल्ह्यातील वारासिवनी गावात घडली आहे. सिद्धांत दमाहे नावाच्या तरुणाने ऑनलाइन गेम खेळण्याच्या नादात आपल्या घरातून दागिने आणि रोख रक्कम चोरली. चोरी केलेले सर्व ८ लाख रुपये त्याने ऑनलाईन गेममध्ये गमावले. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.
चुलत्याने केली पोलिसांत तक्रार
वारासिवनी येथील गजेंद्र दमाहे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, त्यांचा पुतण्या सिद्धांतने घरातून दागिने आणि पैसे चोरले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. सिद्धांतने चोरी केलेले दागिने एका ठिकाणी गहाण ठेवले होते आणि त्यातून मिळालेली सर्व रक्कम ऑनलाईन गेममध्ये लावली.
पोलिसांना सिद्धांतच्या खोलीत दागिने गहाण ठेवलेल्या पावत्या सापडल्या. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले आणि दोन दिवसांची रिमांड घेतली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरले आहे. ऑनलाईन गेम्सचे व्यसन तरुणांना गुन्हेगारीकडे कसे ढकलत आहे, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.