छेड काढल्याच्या संशयातून आचाऱ्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 05:29 IST2022-01-04T05:29:04+5:302022-01-04T05:29:19+5:30

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फेकला उड्डाणपुलाखाली, आरोपी दाम्पत्याला अटक

Achari murdered on suspicion of molestation | छेड काढल्याच्या संशयातून आचाऱ्याची हत्या

छेड काढल्याच्या संशयातून आचाऱ्याची हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलीची छेड काढल्याच्या संशयातून घरातील ६२ वर्षीय आचारीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घाटकोपर मानखुर्द लिंक रोड साठे नगरच्या विरुद्ध बाजूस उड्डाणपुलाच्या खाली फेकल्याची धक्कादायक घटना मानखुर्द पोलिसांच्या कारवाईतून सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मो.सलीम जफर मो. अख्तरआलम उर्फ सलीम (३८) याच्यासह त्याची पत्नी फिरोजा हिला अटक केली आहे.

मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास साठे नगर येथील उड्डाणपुलाच्या खाली एकाचा मृतदेह मिळून आला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालातून मृतदेहाच्या अंगावर जखमा असून मारहाणीमुळे हत्या झाल्याचे समोर आले. हत्येचा गुन्हा नोंदवत मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांचे फोटो व्हायरल केले. फोटो पाहून नंन्ने साबीर शेख (३८) पुढे आले, आणि मृत व्यक्ती त्यांचे सासरे असल्याचे सांगितले. 

पोलिसांना मृत व्यक्ती अब्दुल खलील शेख (६९) हे सलीम यांच्या घरात आचारी म्हणून काम करत असल्याची माहिती मिळताच पथकाने तेथे धाव घेतली. सलीम मिळून आले नाही. 

ते पांजरपोळ परिसरात असल्याची माहिती मिळताच, पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतले. सलीमच्या चौकशीत त्यानेच, शेखची हत्या केल्याची कबुली दिली. मुलीची छेड काढल्याच्या संशयातून त्याने, शनिवारी शेखला मारहाण केली. यात शेखचा मृत्यू झाल्याने त्याला पत्नीच्या मदतीने मानखुर्द परिसरात फेकल्याचे सांगितले. मानखुर्द पोलिसांनी त्याला अटक केली. 

Web Title: Achari murdered on suspicion of molestation