'सेक्सटॉर्शन'ला बळी पडला, नंदुरबारमधील युवकाने संपवलं जीवन
By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: August 5, 2023 14:35 IST2023-08-05T14:31:30+5:302023-08-05T14:35:29+5:30
अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी, पैशाची मागणी

'सेक्सटॉर्शन'ला बळी पडला, नंदुरबारमधील युवकाने संपवलं जीवन
मनोज शेलार/नंदुरबार: अश्लील व्हीडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन अज्ञात व्यक्तीने वारंवार पैशांची मागणी केल्याने कंटाळून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रनाळे, ता.नंदुरबार येथे घडली. सेक्स टॉर्शनचा हा प्रकार असल्याचे बोलले जात असून ज्या दोन मोबाईल क्रमांकावरून त्याच्याकडून वारंवार पैशांची मागणी होत होती ते मोबाईल हाताळणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, रनाळे येथील २४ वर्षीय युवकाला आपण दिल्ली येथील पोलिस असल्याचे सांगून तुझे अश्लिल व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारीत करू अशी धमकी (मोबाईल क्रमांक ८०१३४३७५०७ व ७३४२४३१२२८) दिली जात होती. व्हिडीओ प्रसारीत करायचे नसतील तर पैसे पाठव म्हणून त्यास सांगितले जात होते. त्यानुसार त्याने ३८ हजार ९९९ रुपये संबधितांच्या फोन पे अकाऊंटमध्ये पाठविले देखील. परंतु वारंवार पैशांची मागणी केली जात होती. त्यामुळे युवकाने कंटाळून शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयताच्या मोठ्या भावाने नंदुरबार तालुका पोलिसात फिर्याद दिल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक निलेश गायकवाड करीत आहे.