समाजमाध्यमांवरील आभासी जगातील प्रेम किती जीवघेणं ठरू शकतं, याचा धक्कादायक प्रत्यय मध्य प्रदेशच्या राजधानीत आला आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका महिलेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केल्याची घटना भोपाळमध्ये उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने आपल्या तिसऱ्या पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह दुसऱ्या पत्नीला हुंड्यात मिळालेल्या पत्र्याच्या पेटीत कोंबला आणि ती पेटी पाण्याच्या टाकीत फेकून दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी समीर याला ताब्यात घेतले असून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र राज्यातील गोंदिया येथील रहिवासी असलेली ३३ वर्षीय अशरफी उर्फ सिया ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. इन्स्टाग्रामवर तिचे हजारो फॉलोअर्स होते. याच व्यासपीठावर तिची ओळख भोपाळच्या समीर नावाच्या तरुणाशी झाली. समीर पेशाने रिक्षाचालक आहे. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि सिया आपले घर सोडून समीरसोबत राहण्यासाठी भोपाळला आली. दोघांनी लग्नही केले. मात्र, समीरचा हा संसार आधीच गुंतागुंतीचा होता.
दोन पत्नी, मुलं आणि तिसरीची एन्ट्री
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरने सियाशी तिसरे लग्न केले होते. त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती, तर दुसरी पत्नी त्याच्यासोबतच राहत होती. जेव्हा समीर सियाला घेऊन आपल्या मोहल्ल्यात आला, तेव्हा सुरुवातीला त्याने ती आपली मेहुणी असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. मात्र, नंतर त्यांच्या लग्नाचे सत्य समोर आले. एकाच घरात दोन पत्नींना ठेवण्यावरून समीरच्या घरात सतत वादाचे वातावरण होते. काही दिवसांपूर्वीच दुसरी पत्नी भांडण करून माहेरी जबलपूरला गेली होती.
असा झाला हत्येचा खुलासा
१२ फेब्रुवारी रोजी परिसरातील एका पाण्याच्या टाकीत संशयास्पद पेटी आढळून आली. पोलिसांनी ही पेटी उघडली असता त्यात कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेहाच्या हातावर 'दीप' नावाचा टॅटू आणि जन्म तारीख कोरलेली होती. या खुणांवरून मृतदेहाची ओळख सिया म्हणून पटली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता संशयाची सुई पती समीरकडे वळाली.
दुसऱ्या पत्नीच्या पेटीत तिसरीचा मृतदेह!
तीन दिवसांपूर्वी समीर आणि सिया यांच्यात जोरदार भांडण झाले होते. रागाच्या भरात समीरने सियाचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने घरात असलेली पत्र्याची पेटी काढली. ही तीच पेटी होती जी समीरला त्याच्या दुसऱ्या लग्नात हुंड्यात मिळाली होती. त्याच पेटीत त्याने सियाचा मृतदेह कोंबला आणि घराशेजारील पाण्याच्या टाकीत फेकून दिला. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर समीर निर्धास्तपणे आपल्या दुसऱ्या पत्नीला आणण्यासाठी जबलपूरला गेला होता.
पोलिस तपास सुरू
सियाचा मृतदेह तीन ते चार दिवस जुना असल्याने तो कुजण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून समीरला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली जात आहे. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या दुनियेत रमणाऱ्या एका तरुणीचा शेवट असा एका अंधाऱ्या पेटीत होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Summary : A Bhopal man killed his third wife, whom he met on Instagram, and hid her body in his second wife's dowry trunk, which he dumped in a water tank. The accused is in police custody.
Web Summary : भोपाल में एक व्यक्ति ने इंस्टाग्राम पर मिली अपनी तीसरी पत्नी की हत्या कर दी और उसके शव को अपनी दूसरी पत्नी के दहेज के संदूक में छिपाकर पानी की टंकी में फेंक दिया। आरोपी पुलिस हिरासत में है।