बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात माणुसकीला लाजवणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयावरून गावकऱ्यांच्या एका जमावाने प्रेमी युगुलाला पकडून अमानुष मारहाण केली. इतकेच नाही तर या अमानवी कृत्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या बदनामीचा धक्का सहन न झाल्याने अल्पवयीन पीडितेने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. पोटच्या गोळ्याचा मृतदेह पाहताच आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
काय घडलं नेमकं?
शिकारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात गुरुवारी रात्री ही घटना घडली. पीडित मुलगी शेजारील गावातील एका मुलासोबत असताना गावकऱ्यांनी त्यांना पाहिले. त्यानंतर जमावाने कायदा हातात घेत दोघांनाही पकडले. तरुणी तिथून कशीबशी निसटली, पण जमावाने त्या मुलाला खांबाला बांधून रात्रभर अमानुष मारहाण केली. कडाक्याच्या थंडीत त्याचे कपडे उतरवून त्याला बेदम मारले गेले. संतापजनक बाब म्हणजे शुक्रवारी सकाळी त्या मुलाचे मुंडण करून आणि तोंडाला काळे फासून त्याची गावातून धिंड काढण्यात आली.
बदनामीच्या भीतीने संपवलं जीवन
जमावाच्या या क्रूरतेचा व्हिडीओ काही लोकांनी मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ जेव्हा पीडित मुलीपर्यंत पोहोचला, तेव्हा लोकलाजेस्तव आणि मानसिक त्रासामुळे ती पूर्णपणे कोलमडली. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना तिने गळफास लावून आत्महत्या केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मुलीचा मृतदेह पाहताच तिच्या आईला हार्ट अटॅक आला. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पित्याचा गंभीर आरोप: 'ही हत्याच!'
मुलीच्या वडिलांनी हा सर्व प्रकार एक नियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. "माझी मुलगी घरात झोपली होती, तिला जाणीवपूर्वक बाहेर बोलावण्यात आले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार करून तिला मरण्यास भाग पाडले," असा टाहो वडिलांनी फोडला आहे.
पोलीस कारवाई आणि तपास
घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ जयप्रकाश सिंह आणि पोलीस फौजफाटा गावात दाखल झाला. पोलिसांनी जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले असून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. "या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. व्हिडीओ व्हायरल करणारे आणि मारहाण करणारे दोषी कितीही मोठे असले तरी त्यांना सोडले जाणार नाही," असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Web Summary : Bihar villagers brutally beat a young couple over suspicion of romance, filming and sharing the assault. The girl died by suicide, her mother suffered a heart attack. Police are investigating.
Web Summary : बिहार में ग्रामीणों ने प्रेम संबंध के शक में एक युवा जोड़े को बेरहमी से पीटा, मारपीट का वीडियो बनाया और साझा किया। लड़की ने आत्महत्या कर ली, उसकी माँ को दिल का दौरा पड़ा। पुलिस जांच कर रही है।