अगोदर पुतण्याला भोसकले, मग पोलिसवाल्या काकावरदेखील चाकूने वार
By योगेश पांडे | Updated: November 6, 2023 22:01 IST2023-11-06T22:01:05+5:302023-11-06T22:01:09+5:30
सुनीलने आरोपीला यशवर हल्ला करण्याचे कारण विचारले. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी तुलादेखील वर पोहोचवतो असे म्हणत सुनीलवरही चाकूने वार केले

अगोदर पुतण्याला भोसकले, मग पोलिसवाल्या काकावरदेखील चाकूने वार
नागपूर : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पोलीस हवालदार आणि त्याच्या पुतण्यावर समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला आहे. पोलिसांनी आरोपी श्रीरत्न फुले या आरोपीला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार वैभव गणेश श्रावणे (गणेश नगर) हा फरार आहे. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.
रविवारी रात्री गणेश नगर येथील राजीव गांधी उद्यानाजवळ ते दारू पीत होते. दरम्यान, यश देवराव ठवकर (तिरंगा चौक, सक्करदरा) हा तेथे पोहोचला. त्याचा आरोपींसोबत वाद झाला. आरोपींनी यशवर दारूच्या बाटलीने हल्ला केला. डोक्यावर व छातीवर वार करून गंभीर जखमी केले. तसेच छातीवर चाकूने वार केले. यशने फोन करून काका सुनील ठवकर यांना घटनेची माहिती दिली. सुनील हे गुन्हे शाखेच्या युनिट चारमध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहेत. ते लगेच तिथे पोहोचले. त्यांना यश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
हातात चाकू घेऊन दोन्ही आरोपीदेखील तेथे उपस्थित होते. सुनीलने आरोपीला यशवर हल्ला करण्याचे कारण विचारले. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी तुलादेखील वर पोहोचवतो असे म्हणत सुनीलवरही चाकूने वार केले. पोलिस कर्मचारी आणि त्याच्या पुतण्यावर हल्ला झाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकारी आणि कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुनील ठवकर यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याचा जबाब नोंदवता आला नाही.