नाशिक - नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे काही ग्रामस्थांच्या जाचाला कंटाळून प्रेमीयुगुलाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील मयत महिलेच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर नांदगाव पोलिसांनी १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या तीन महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी पाच जणांना या प्रकरणात ताब्यात घेतले आहे.
या घटनेतील महिला आशा कर्मचारी असून तिचे गावातील युवकाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला गावातीलच काही मंडळींचा विरोध होता. तिने प्रियकराशी संबंध तोडून टाकावे यासाठी गावातील काही मंडळींचा प्रयत्न सुरू होता. जर प्रेमसंबंध तोडले नाही तर जगू देणार नाही, आत्महत्या करा अशा धमक्या दिल्या जात होत्या. या त्रासाला कंटाळून या प्रेमीयुगुलाने तालुक्यातील नस्तनपूरजवळील रेल्वे ट्रॅकवर धावत्या रेल्वेखाली रात्री स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली आहे.
या घटनेत १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. मयत महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला लिहिलेल्या चिठ्ठीचा फोटो व्हॉट्सअप केला, त्यानंतर आत्महत्या केली. ज्या धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली तिच्या चालकाने हा प्रकार स्टेशन मास्टरला कळवला.
दरम्यान, प्रेमीयुगलाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत अरूण गायकवाड, संदीप सावंत, प्रकाश सावंत, नवनाथ जाधव, संतोष पवार, अनिल दखने, संजय सोनावणे, रोहिदास सोनावणे, सोपान गुंडगळ, सुनिता पवार, सोनल पवार, जन्याबाई गुंडगळ, नितीन घाडगे, सतीश जाधव, बाळू गोसावी, छगन साठे यांनी वेळोवेळी आम्हाला धमकी देऊन आम्ही तुम्हाला मारून टाकू नाहीतर तुम्ही आत्महत्या करा अशी धमकी दिल्याने मी आणि माझा प्रियकर आत्महत्या करत आहोत असं चिठ्ठीत म्हटलं आहे.