आयकर विभागाच्या ९ कर्मचाऱ्यांना सीबीआयकडून अटक; ‘स्टाफ सिलेक्शन’च्या परीक्षेत बसवले होते डमी उमेदवार
By योगेश पांडे | Updated: December 13, 2022 22:45 IST2022-12-13T22:40:16+5:302022-12-13T22:45:14+5:30
रिंकी यादव, सरिता, अनिल कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, मनोज कुमार, प्रदीप कुमार, मनिष कुमार आणि धर्मेंद्र कुमार अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहे. सर्व जण आयकर विभागात ‘एमटीएस’ (मल्टी स्पेशलिटी स्टाफ) पदावर कार्यरत होते.

आयकर विभागाच्या ९ कर्मचाऱ्यांना सीबीआयकडून अटक; ‘स्टाफ सिलेक्शन’च्या परीक्षेत बसवले होते डमी उमेदवार
नागपूर : ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’च्या परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या प्रकरणात ‘सीबीआय’ने आयकर विभागाच्या नागपूर कार्यालयातील नऊ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या नऊ जणांनी २०१२ ते २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेत डमी उमेदवार बसविले होते. या कारवाईमुळे आयकर विभागात खळबळ उडाली आहे.
रिंकी यादव, सरिता, अनिल कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, मनोज कुमार, प्रदीप कुमार, मनिष कुमार आणि धर्मेंद्र कुमार अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहे. सर्व जण आयकर विभागात ‘एमटीएस’ (मल्टी स्पेशलिटी स्टाफ) पदावर कार्यरत होते. २०१२ ते २०१४ या कालावधीत स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे पदभरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. हे नऊही जण त्या परीक्षेला प्रत्यक्ष उपस्थित झाले नव्हते. त्यांच्याऐवजी डमी उमेदवारांनी परीक्षा दिली होती व त्याच्या आधारावर हे सर्व जण उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर यांची ‘एमटीएस’ व स्टेनोग्राफर पदावर नियुक्ती झाली होती. यासंदर्भात ६ मार्च २०१८ रोजी नागपूर सीबीआयच्या एसीबीने गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून यांची चौकशी सुरू होती. सीबीआयने त्यावेळी १२ जणांविरोधात चौकशी सुरू केली होती. हे सर्व उमेदवार डमी उमेदवारांच्या भरवशावरच परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बाब चौकशीतून समोर आल्यानंतर नऊ जणांनादेखील अटक करण्यात आली. उपमहानिरीक्षक सलीम खान यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक संदीप चोगले यांनी ही कारवाई केली. नऊ डमी उमेदवारांचा शोध घेण्यासाठी आता या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले व त्यांना १६ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
‘फॉरेन्सिक’ विश्लेषणानंतर समोर आले सत्य
२०१८ साली गुन्हा दाखल झाल्यानंतर १२ उमेदवारांचे पेपर व इतर कागदपत्रे ‘फॉरेन्सिक’ विश्लेषणासाठी पाठविण्यात आले होते. उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर, स्वाक्षरी, अंगठ्याचे ठसे यांची तपासणी करण्यात आली. या कर्मचाऱ्यांचे हस्ताक्षर, स्वाक्षरी व अंगठ्याच्या ठशांचेदेखील नमुने घेण्यात आले होते. १२ पैकी ९ उमेदवार परीक्षेत सहभागीच झाले नव्हते हे त्यातून समोर आले.