टोनी कक्करचं गाणं ऐकून ८ वर्षांच्या मुलानं डॉक्टरांकडे मागितली ३ कोटींची खंडणी अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 03:54 PM2022-05-14T15:54:32+5:302022-05-14T15:56:08+5:30

टोनी कक्करचं गाणं ऐकून तिसरीत शिकणाऱ्या मुलानं डॉक्टरांकडे मागितली ३ कोटी रुपयांची खंडणी

8 year old Makes a Ransom Call After Watching Tony Kakkars Music Video | टोनी कक्करचं गाणं ऐकून ८ वर्षांच्या मुलानं डॉक्टरांकडे मागितली ३ कोटींची खंडणी अन् मग...

टोनी कक्करचं गाणं ऐकून ८ वर्षांच्या मुलानं डॉक्टरांकडे मागितली ३ कोटींची खंडणी अन् मग...

Next

देहरादून: तिसरीत शिकणाऱ्या एका ८ वर्षीय मुलामुळे उत्तराखंड पोलीस चांगलेच त्रासले. उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात राहणाऱ्या मुलानं हल्दवानीतील एका डॉक्टरांना कॉल केला. कान नाक घशाचे तज्ज्ञ असलेल्या डॉ. वैभव कुच्चल यांना कॉल करून मुलानं तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली. 

खंडणीसाठी फोन येताच डॉ. कुच्चल यांनी पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपनं (एसओजी) मोबाईल नंबरचा शोध सुरू केला. खंडणीसाठी ज्या नंबरवरून कॉल आला, तो ऍक्टिव्ह असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. नंबरचा शोध घेत पोलीस हापूरला पोहोचले. खंडणीसाठी ज्या नंबरवरून कॉल आला, तो एका फर्निचर दुकानाच्या मालकाचा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

'मोबाईल नंबर दुकान मालकाच्या नावे होता. मात्र तो नंबर त्यांची पत्नी वापरायची. दुकानदाराच्या नावे असलेला फोन नंबर वापरून त्याच्या ८ वर्षीय मुलानं डॉक्टरांना धमकीचा कॉल केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं,' अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक पंकज भट यांनी दिली. 

पोलिसांनी फर्निचर दुकानाच्या मालकाला मुलासह चौकशीसाठी बोलावलं. मुलगा तंत्रज्ञानस्नेही, गेमर असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली. यासोबतच तो यूट्यूबचादेखील सातत्यानं वापर करत असल्याचं समजलं. काही रँडम नंबर वापरून फोन कॉल केला, असं मुलानं डॉ. वैभव कुच्चल यांच्यासमोर सांगितलं. 

मुलगा यूट्यूबवर टोनी कक्करचं एक गाणं पाहत होता. त्याचं टायटल 'नंबर लिख ९८९७१..' असं होतं. डॉ. कुच्चल यांच्या फोन नंबरची सुरुवात याच आकड्यांनी होते. ९८९७१ नंबर डायल केल्यानंतर मुलानं पुढे रँडम नंबर डायल केले आणि डॉ. कुच्चल यांना फोन लागला. मुलाला बाल कल्याण समितीच्या सदस्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याचं समुपदेशन करण्यात आलं.

Web Title: 8 year old Makes a Ransom Call After Watching Tony Kakkars Music Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.