फायनान्स कंपनीला ३४ लाखांचा गंडा; बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 12:59 PM2024-03-18T12:59:56+5:302024-03-18T13:00:17+5:30
वाशीतील हिरो फायनान्स कंपनीला बनावट ग्राहकाने ३४ लाखांचा चुना लावला
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: बनावट कागदपत्रांच्या आधारे ३४ लाखांचे गृहकर्ज मिळवून फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशीतील हिरो फायनान्स कंपनीला बनावट ग्राहकाने ३४ लाखांचा चुना लावला आहे. त्याशिवाय या व्यक्तीने इतरही बँकांकडून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज मिळवून फसवणूक केली आहे. हिरो हाऊसिंग फायनान्स कंपनीला त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार कर्ज मिळवणारी व्यक्ती आणि दोन साक्षीदार यांच्यावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील ब्रिजेश सरोज नावाच्या व्यक्तीने कंपनीकडे गृहकर्जासाठी अर्ज केला होता.
यासाठी त्याने पनवेल येथे घर खरेदी केल्याची कागदपत्रे सादर केली होती. त्यानुसार फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने संपूर्ण प्रक्रिया पार पाडून सकारात्मक अहवाल दिला होता. त्याद्वारे ब्रिजेशला ३४ लाख १० हजारांचा कर्जाचा धनादेश देण्यात आला होता; मात्र काही दिवसांनी कंपनीने विकासकाकडे केलेल्या चौकशीत कागदपत्रे बनावट असून फसवणुकीचा प्रकार उघड झाला. तसेच ब्रिजेश याने इतरही बँकांना गृहकर्जासाठी अर्ज करून कर्ज मिळवून अपहार केल्याचे समोर आले आहे. यामागे त्याला कर्ज मिळवून देणाऱ्यांचादेखील हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.