कर्नाटकातील बंगळुरुमध्ये एका ३३ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल आहे. पीडित महिला मूळची दिल्लीची असून, तिच्यावर चौघांनी आळीपाळीने अत्याचार केले. गुरुवारी रात्री ही घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींमध्ये हॉटेलमधील शेफ आणि वेटरचाही समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कॅटरिंग सेवा क्षेत्रात काम करते. पीडिता विवाहित असून, तिने चार जणांनी अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केलेले आहे. आरोपींनी महिलेसोबत मैत्री केली आणि त्यानंतर तिला जेवायला बोलावले.
हॉटेलच्या छतावर नेऊन अत्याचार, जीवे मारण्याची धमकी
महिला हॉटेलमध्ये जेवायला गेली. रात्रीचे जेवण झाल्यानंतर आरोपी तिला हॉटेलच्या छतावर घेऊन गेले आणि तिथेच त्यांनी तिच्यावर अत्याचार केले.
त्यानंतर आरोपींनी तिला याबद्दल कुणाकडेही वाच्यता करू नको अन्यथा जीवे मारू अशी धमकी दिली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी आरोपींनी तिला सोडून दिले. घरी आल्यानंतर तिने घडलेला सगळा प्रकार पतीला सांगितला.
तीन पश्चिम बंगालचे, तर एक जण उत्तराखंडचा
पोलीस अधिकारी सराह फातिमा यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी साडेसात ते आठ दरम्यान आम्हाला एक कॉल आला. आम्ही पीडितेच्या घरी पोहोचलो. कोरामंगळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना आहे. यात चार २० वर्षांची मुले आरोपी आहेत.
चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ते वेगवेगळ्या हॉटेलमध्ये शेफ आणि वेटर म्हणून काम करतात. तीन जण पश्चिम बंगालमधील आहेत, तर एक जण उत्तराखंडमधील आहे. पीडितेची प्रकृती व्यवस्थित असून, ती मूळची दिल्लीची आहे. मागील सहा ते सात वर्षांपासून बंगळुरूमध्ये काम करते, असे पोलीस अधिकारी फातिमा यांनी सांगितले.