Solapur Crime: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात जेवण करत नाही, शाळेला जात नाही या कारणावरून सावत्र आईने तीन वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून केला. वडवळ परिसरात १ ऑगस्ट रोजी सावत्र आईने केलेल्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. याप्रकरणी सावत्र आईच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अन्य दोन मुलींनी सावत्र आईच्या कृत्याची माहिती दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
तेजस्विनी नागेश कोकणे असे आरोपी महिलेचे नाव आहे. मोहोळ पोलिस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल अश्विनी सतीश घोलप यांना १ ऑगस्ट रोजी गुरुदेव तानाजी खरात यांचा मोबाइलवरून कॉल आला होता. वडवळ बसस्टॉप येथील मोहोळ रेल्वे स्टेशन रोडवर शेजारी १५ दिवसांपूर्वी एक कुटुंब राहण्यासाठी आले आहे. त्यांच्या घरासमोर दोन मुली रडत बसल्या आहेत. त्यांच्या अंगावर भाजलेले जखमा दिसत आहेत. तुम्ही चौकशी करा, असं फोनवरुन सांगण्यात आलं होतं.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील यांना घटनास्थळी रवाना केले. चौकशीत नागेश कोकणे हा कुटुंबासह तिथे राहत असून त्याच्या घरात तीन लहान मुली असल्याची माहिती मिळाली. घरातून नेहमीच मुलींचा जोरजोरात रडण्याचा आवाज येत असतो असंही चौकशीत कळलं. त्यानंतर पोलिसांनी घराबाहेर बसलेल्या दोन मुलींना विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मुलींनी आमची दुसरी मम्मी व पप्पा आमच्या लहान बहिणीला घेऊन दवाखान्यात गेले आहेत असं सांगितले. आई लहान बहीण जेवण करत नाही आणि शाळेलाही जात नाही म्हणून तिला अंगावर चटके देत असल्याचेही सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली.
शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रागाच्या भरात तेजस्विनीने तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केली. दोन मुलीकडे विचारणा केली असता त्यांनी कीर्ती ही जेवत नसल्याने मम्मीने कीर्तीला हाताने गळा दाबून मारल्याचे सांगितले. याबाबत कोणास सांगू नका, असे आम्हाला तेजी मम्मीने सांगितले होते, असंही या मुली म्हणाल्या.
दरम्यान, फिर्यादीनुसार तेजस्विनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस्विनीला अटक करून न्यायालयात हजर केले असता ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.