रिक्षा चोरी करणाऱ्या दुकलीला अटक; चार गुन्ह्यांची उकल करून रिक्षा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2022 20:05 IST2022-08-22T20:05:26+5:302022-08-22T20:05:42+5:30
चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व दाखल गुन्ह्यांची उकल करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या

रिक्षा चोरी करणाऱ्या दुकलीला अटक; चार गुन्ह्यांची उकल करून रिक्षा हस्तगत
मंगेश कराळे
नालासोपारा - माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी रिक्षा चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून चार गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या चार रिक्षा हस्तगत केल्या आहेत. यांचे कोणी साथीदार किंवा चोरी अजून कुठे केल्या आहेत का याचा शोध घेत पोलीस पुढील तपास करत आहे.
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चोरी व इतर वाहनांच्या चोरीच्या गुन्ह्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सदर वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व दाखल गुन्ह्यांची उकल करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेटी देवुन तांत्रिक माहितीच्या आधारे मुंब्रा परिसरात सापळा लावून १५ ऑगस्टला इम्तियाज कादरी (५०) आणि आमिर शेख उर्फ बल्ले (२५) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तपासा दरम्यान आरोपीकडून १ लाख ९५ हजार रुपये किंमतीच्या चार चोरीच्या रिक्षा हस्तगत करून चार गुन्ह्यांची उकल केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सोमवारी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी दिली आहे.