केरळमधील मलप्पुरममध्ये एका १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात, मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे की, तिचा नवरा आणि सासरचे लोक तिच्या दिसण्यावरून, रंगावरून आणि इंग्रजी नीट येत नसल्याने तिला खूप टोमणे मारत होते.
१४ जानेवारी रोजी सकाळी मलप्पुरम जिल्ह्यातील कोंडोट्टी येथील घरी तरुणी मृतावस्थेत आढळली. मे महिन्यात तिचं लग्न अबू धाबीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाशी झालं होतं. शहानाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, तिच्या नवऱ्याने आणि सासरच्यांनी तिला हे टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडलं.
मुलीच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात लग्न झाल्यानंतर दोघेही त्यांच्या घरी सुमारे २२ दिवस आनंदाने राहिले. त्यानंतर मुलगा अबू धाबीला निघून गेला. तिकडे गेल्यावर मात्र त्याने मुलीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि तिच्या रंगामुळे आणि इंग्रजी नीट येत नसल्यामुळे तिला त्रास देऊ लागला.
जेव्हा त्याने मुलीचे फोन घेणं बंद केलं, तेव्हा ती त्याला सतत मेसेज करत राहिली पण तो रिप्लाय देत नसे. अशा परिस्थितीत, जेव्हा तिने तिच्या सासूला याबद्दल सांगितलं तेव्हा सासू देखील मुलीलाच बोलू लागली. मुलाला सुंदर दिसणारी मुलगी हवी होती असं म्हणाली. तसेच आता ती तिच्या मुलासाठी एक चांगली जोडीदार शोधेल असं सांगितलं. यामुळेच तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.