प्रदीप भाकरे, अमरावती: आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित असलेल्या १० जणांना परतवाडा येथील ब्राह्मणसभा भागातून ताब्यात घेण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास ही चकमक घडली. मुंबई क्राइम ब्रांच व हरयाणा पोलिसांच्या माहितीवरून नागपूर शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे एक पथक व अमरावती ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
अधिक माहिती अशी की, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या गँगशी संबंधित असलेले काही जण ब्राह्मणवाडा येथील एका घरामध्ये दडल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख व त्यांच्या पथकाने परतवाड्यातील ब्राह्मणसभा भागातील एक घर लक्ष्य केले. संशयित पळून जाण्यापूर्वी पोलिस पथकाने त्या घराचे दार तोडून आत प्रवेश मिळवला आणि त्या साऱ्यांना ताब्यात घेतले.
ते सर्वजण कुख्यात गँगशी संबंधित असल्याचा पोलिसांचा कयास आहे. एका घरामध्ये दडून असलेल्या त्या गँगच्या सदस्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला, पण पोलिसांनी तो परतवून लावल्याचे वृत्त आहे. तसेच या चकमकीदरम्यान हवेत फायरिंग देखील झाल्याची माहिती आहे. मात्र त्याला पोलीस यंत्रणेकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. ताब्यात घेतलेल्या त्या सर्व संशयितांची परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये कसून चौकशी केली जात आहे. प्रथमदर्शनी ताब्यात घेतलेल्यांपैकी केवळ एक जण त्या गँगचा सक्रिय सदस्य असल्याची माहिती उघड झाली आहे.