पात्र महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान द्या मागणी : विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन

पात्र महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान द्या मागणी : विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन

जळगाव : मूल्यांकनात पात्र ठरलेल्या महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदानासह नियुक्त प्राध्यापकांना पगार अदा करावा या मागणीसाठी राज्य विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
गेल्या १६ वर्षांपासून विनावेतन ज्ञानदानाचे काम करणार्‍या विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणून १८ ऑक्टोबरपासून या शिक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे. २४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
तर आमरण उपोषण
विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांचे हे १८१ वे आंदोलन आहे. ३० वर्षातील नोकरीतील अनेक शिक्षकांचे १६ वर्ष विनावेतन गेले. शासनाने २० टक्के अनुदान जाहीर करणे हा अन्याय आहे. ४० ते ४५ वर्षानंतर एक रुपया देखील खिशात पडलेला नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांनी जीवनयात्रा संपविल्याचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल परदेशी यांनी सांगितले. मागण्यांवर सकारात्मक विचार न झाल्यास २९ ऑक्टोबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
ज्युक्टो संघटनेचा पाठिंबा
राज्य शासन प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान देत आहे. मात्र १५ वर्षांपासून विनावेतन राबणार्‍या उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांवर अन्याय करीत आहे. या शिक्षकांच्या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे ज्युक्टोचे जिल्हाध्यक्ष विकास सोनवणे यांनी सांगितले. आमदार सुधीर तांबे, आमदार सुरेश भोळे यांनी भेट देऊन हा प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनात यांचा होता सहभाग
जिल्हाध्यक्ष अनिल परदेशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुनील गरूड, संदीप विचवे, पराग पाटील, सुधीर चौधरी, विलास काळे, विनोद वाघ, दिनेश पाटील, नारायण पाटील, नीलेश पाटील, प्रवीण पाटील, सुधीर चौधरी, नासेर गवळी, विजय ठोसर, अतुल पाटील, हुसेन शेख, जितेंद्र पाटील, कैलास पवार, अविनाश पाटील, महेंद्र पाटील, नीलकंठ पाटील, राहुल पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Demand for 100% grant to eligible colleges: Demand movement of unaided high school teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.