छत्रपती संभाजीनगर : घरी बसून विविध टास्क पूर्ण करण्याचे 'स्मार्ट वर्क'चे आमिष दाखवून ४० वर्षीय शेतकरी रमेश जाधव (रा. पिसादेवी परिसर) यांना सायबर गुन्हेगारांनी ७ लाख ७६ हजारांचा गंडा घातला. रविवारी याप्रकरणी हर्सूल पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
३ जानेवारीला जाधव यांना सर्वप्रथम अज्ञात क्रमांकाद्वारे संपर्क करून ‘पार्ट टाईम‘ कामाविषयी विचारण्यात आले. तेव्हा स्पष्ट नकार देऊनही ६ जानेवारीला पुन्हा संपर्क करून ते काम करण्याची गळ घातली. रजिस्ट्रेशन करताच २०० रुपये देण्याचे आश्वासन देत राधिका नामक तरुणीने व्हॉट्स ॲपवर संपर्क साधला. लिंक, टेलिग्रामद्वारे संपर्क साधून कामाची प्रक्रिया सुरू केली. सांगितल्याप्रमाणे जाधव पेड अनपेड टास्क पूर्ण करीत गेले. ‘पेड टास्क’द्वारे सात हजार रुपये गुंतविले. त्यावर ८ हजार ५०० रुपयांचा परतावा देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ‘टास्क’मध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी २८ हजार ९५० रुपये भरण्यास सांगितले. जाधव सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत गेले आणि त्यांनी ही रक्कम भरली.
२८ हजार ते ७ लाखआरोपींनी जाधव यांना २०० रुपये देण्याचे आमिष दाखवत पहिले २८ हजारांची मागणी केली. ती दोन दिवसांतच विविध कारणे सांगून ७ लाख ७६ हजारांपर्यंत गेली. नफा व पैसे परत मिळण्याच्या अपेक्षेने जाधवदेखील सर्व रक्कम भरत गेले. पैसे केवळ उकळले जात असल्याचे लक्षात आल्यावर आपण फसले गेल्याचे जाधव यांना समजले.
विश्वास जिंकण्यासाठी मुलींचा वापरसमोरच्याचा विश्वास जिंकण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून कॉल, मेसेजसाठी मुलींचा वापर केला जात आहे. विनंती करून समजावून सांगण्याचे नाटक करीत ते सामान्यांना जाळ्यात अडकवितात. जाधव यांनादेखील राधिका, प्रिया अभिषेक अशी खोटी नावे सांगून सातत्याने काॅल, मेसेज केले जात होते.