छत्रपती संभाजीनगर: शहरातील मुख्यरस्ता जालना रोडवर ऐन वर्दळीच्या वेळी एका तरुणाने बुलेटवर उभे राहून दोन्ही हात रिकामे सोडत स्टंटबाजी केली. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, ज्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून हा व्हिडिओ पोस्ट झाला होता ते अकाऊंट डिलिट करण्यात आले आहे. आधी स्टंटबाजी आता अकाऊंट डिलिट करण्याची नामुष्की अशी परिस्थिती तरूणावर आली आहे.
जालना रोड हा शहरातील मुख्य रस्ता असून दिवसरात्र यावर लहान मोठ्या वाहनांची वर्दळ असते. अशा रोडवरील मोंढा नाका उड्डाणपुलावर एक तरुणाने बुलेटवर स्टंटबाजी केली आहे. ही घटना कधीची आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही मात्र, या स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असल्यानुसार, मोंढा नाका उड्डाणपुलावरून आकाशवाणीच्या दिशेने येताना भरधाव वेगातील बुलेटवर एक तरुण अचानक उभा राहतो. तसेच काही वेळाने दोन्ही हात बाजूला करत स्टंट करत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण स्टंटचा व्हिडिओ सचिन लिपने नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याची दखल पोलिसांनी देखील घेतली असून तरुणाचा शोध सुरू आहे.
सोशल मिडियात तीव्र प्रतिक्रियाया बुलेटवर समोरून नंबर प्लेट नाही. तसेच या स्टंटबाजी वेळी बुलेटवर पाठीमागे एक दूसरा तरुण बसलेला आहे. स्वतःसह बुलेटवरील आणखी एकाचे आणि रस्त्यावरील सामान्य नागरिकाचा जीव एका स्टंटसाठी त्याने धोक्यात घातल्याने सोशल मिडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, ज्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला ते सचिन लिपने हे इन्स्टाग्राम अकाऊंट सध्या डीअॅक्टिव असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून तरुणाला चांगला धडा शिकविण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. संबंधित तरुणांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.