छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून कनिष्ठ अभियंते, डॉक्टर आदी मनुष्यबळ पुरविणाऱ्या ‘महाराणा एजन्सी’चे काम थांबविण्याचा मोठा निर्णय आज प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. महापालिकेने एजन्सीसोबत केलेल्या कराराला स्थगिती देण्यात आली. पुढील तीन दिवसांत ‘महाराणा एजन्सी’ने कर्मचाऱ्यांचा पगार, भविष्य निर्वाह निधी, ‘इएसआयसी’ची रक्कम भरावी. ‘महाराणा एजन्सी’कडे असलेले सर्व कर्मचारी ‘गॅलक्सी’ आणि ‘अशोका’ या दोन एजन्सींकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
काही दिवसांपासून ‘महाराणा एजन्सी विरुद्ध प्रशासन’ असे युद्ध सुरू होते. या एजन्सीला अतिरिक्त २२ कोटी रुपये अदा करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. थोडे-थोडे करून ही रक्कम एजन्सीने भरावी, असा आग्रह प्रशासनाचा होता. एजन्सीने कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार खिशातून करावा, पीएफ, इएसआयसीसुद्धा भरावी, अशी सूचना प्रशासनाने केली होती. महापालिका कर्मचाऱ्यांना जेवढा पगार देते तेवढा पगार कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. अलीकडेच प्रशासक जी. श्रीकांत यांनी विभागनिहाय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणारी पगाराची रक्कम, पीएफ, इएसआयसीची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. सोमवारी महापालिकेत कामगार विभागाची बैठक घेण्यात आली. बैठकीत महाराणा एजन्सीचे काम थांबविल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
३.८४ टक्के दराने काम‘महाराणा एजन्सी’कडे असलेले कामगार ‘गॅलक्सी’ आणि ‘अशोका’ या दोन एजन्सींकडे सोपविल्याचे जी. श्रीकांत यांनी नमूद केले. संबंधित एजन्सींना भविष्यात ३.८४ टक्के दराने काम करावे लागेल. मनपा कर्मचाऱ्यांना जेवढा पगार देईल, तो शंभर टक्के कर्मचाऱ्यांना दिला गेला पाहिजे. त्यात एक रुपयाही कमी केला, तर ते प्रशासन खपवून घेणार नाही. महाराणा एजन्सीकडे असलेल्या २ हजार कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा खूप मोठा निर्णय असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.