छत्रपती संभाजीनगर : नखांवरील पांढरे डाग बऱ्याच वेळा दुर्लक्षित केले जातात, पण हे आरोग्यासाठी महत्त्वाचे संकेत देऊ शकतात. कधीकधी हे डाग पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे, तर कधी गंभीर आजारांचे लक्षण असू शकतात. लहान मुलांमध्ये हे डाग अधिक दिसून येतात, परंतु प्रौढांनाही याचा त्रास होऊ शकतो. वेडीवाकडी नखे, तुकडे पडणे किंवा नखांचा पातळपणा हे देखील आरोग्याच्या समस्यांचे संकेत असू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले.
लहान मुलांच्या नखांवर जास्त डागलहान मुलांमध्ये पोषणतत्त्वांची कमतरता अधिक दिसते. झिंक, कॅल्शियम किंवा प्रथिनांची कमतरता डागांना कारणीभूत ठरते. रसायनाची (नेल पॉलिश किंवा जेल आधारित नेलपेंट) ॲलर्जी, तर काहीवेळा नखांवर पांढरे डाग आनुवंशिक कारणांमुळेही येतात. रक्ताची कमतरता, शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे नखांवर पांढरे डाग तयार होतात. काही वेळ बुरशीजन्य संसर्गामुळेही नखांवर पांढरे डाग पडतात.
पोषणतत्त्वे, प्रथिनांची कमतरताझिंक, आयर्न, कॅल्शियम आणि प्रथिनांची कमतरता नखांवर परिणाम करते. व्हिटॅमिन बी-१२ आणि फॉलिक ॲसिडचा अभावही डागांचा एक कारण ठरतो. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. विशेषत: प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. ॲलर्जी आणि धोकादायक रसायनांपासून दूर राहावे.
नखं वेडीवाकडी कशामुळे होतात ?थायरॉइडचे विकार, लिव्हरच्या समस्या किंवा आनुवंशिक कारणांमुळे नखं वेडीवाकडी होऊ शकतात. नखांवर वारंवार झालेल्या जखमा किंवा बाह्य दुष्परिणामामुळेही असे होऊ शकते.
कॅल्शियम, मिनरल्सही आवश्यकमजबूत आणि आरोग्यदायी नखांसाठी कॅल्शियम, झिंक आणि बायोटिन महत्त्वाचे ठरते. हाडे आणि नखांसाठी ‘व्हिटॅमिन-डी’ देखील गरजेचे आहे.
किडनी फेल्युअर, हृदयविकाराचे सूचकगंभीर पांढरे डाग कधी कधी किडनी विकारांचे किंवा हृदयविकाराचे लक्षण असतात. क्रॉनिक आजारांमुळे नखांमध्ये बदल होऊ शकतो.
नखांची स्वच्छता ठेवानखांवर पडणारे पांढरे डाग लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता आणि शरीरातल्या रक्तात प्रथिनांचं प्रमाण कमी असल्याने असे हाेते. जास्त सौंदर्यप्रसाधने अथवा कृत्रिम नखे वापरू नका. नखांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.
तुम्हाला नखांची कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डाॅ. सुनील सरोदे, बालरोगतज्ज्ञ