बीड : भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे हे बीडचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते़ सत्ता असो किंवा नसो गोपीनाथराव मुंडे यांनी आपला रुबाब कायम ठेवला़ सत्तेबाहेर राहूनही हेलिकॉप्टरमधूनच फिरणारे ते एकमेव नेते होते़ गोपीनाथराव मुंडे हे जिथे जातील तेथे त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची गर्दी जमायची़ गर्दी खेचणारा अन् आपल्या तडाखेबंद भाषणातून प्रभाव निर्माण करणारा नेता म्हणून पक्षातही त्यांना मानाचे स्थान होते़ महाराष्ट्र भाजपातील ते महत्त्वाचे नेते होते़ त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पक्षातील कुठलाही निर्णय होत नव्हता़ पक्षात मुंडेंचा शब्द प्रमाण मानला जात होता़ मुंडे यांनी जनसामान्यांच्या मनात घर निर्माण केले होते़ त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे़ त्यामुळे प्रत्येक निवडणुकांत त्यांच्या सभा, मेळाव्यांना महत्त्व होत़े कारप्रवासतून राज्य पिंजून काढणे शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी हवाईसफरीवरच भर दिला़ युती सरकारच्या काळात मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला़ तब्बल १४ वर्षांच्या संघर्षानंतर आता कोठे ते केंद्रात मंत्री झाले होते़ १४ वर्षे सत्तेबाहेर राहूनही त्यांनी हेलिकॉप्टर प्रवासालाच पसंती दिली़ विरोधी बाकात बसूनही हेलिकॉप्टरचा रुबाब फक्त मुंडेंनीच गाजवला.(प्रतिनिधी) शेवटचा प्रवासही हेलिकॉप्टरनेच गोपीनाथराव मुंडे यांचे मंगळवारी कार अपघातात निधन झाले़ त्यानंतर त्यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी दिल्ली येथून विशेष विमानाने मुंबईला आणले़ बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत़ मुंबईहून त्यांचे पार्थिव लातूर येथे विमानाने येणार आहे़ त्यानंतर लातूर येथून हेलिकॉप्टरने त्यांचे पार्थिव परळीला आणण्यात येईल़ त्यामुळे मुंडे यांचा शेवटचा प्रवासही हेलिकॉप्टरनेच होत आहे़
सत्ता असो अथवा नसो; प्रवास हेलिकॉप्टरनेच!
By admin | Updated: June 4, 2014 01:30 IST