छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रमुख पाच रस्ते विकसीत करण्यासाठी पेडेको या संस्थेकडून डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यावरच कामे सुरू होतील. पडेगाव येथील मुख्य रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. हे काम महापालिकेच्या डीपीआरनुसार होईल. उर्वरित सर्व्हिस रोड व अन्य कामे महापालिका करणार असल्याचे मत प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.
महापालिकेच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृहप्रकल्पासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, प्रशासनाने सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर दिला आहे. पूर्वी कोणत्याही विकासकामाची फाईल शोधायला बराच वेळ लागत होता. आता फाईल ऑनलाईन केल्याने एका मिनिटात सापडते. कामात पारदर्शकता येणे गरजेचे आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी ॲपचे लोर्कापण केले. याचा फायदाही मनपाला होईल. वसुली कर्मचाऱ्यांवर आता कारणे सांगता येणार नाहीत.
मुख्य रस्त्यांची कामेही होतीलशहरातील मुख्य रस्त्यांची कामे मनपा निधीतून करता येणार नाहीत का? या प्रश्नावर प्रशासक म्हणाले की, पाच रस्त्यावर रुंदीकरण मोहीम राबविण्यात आली. हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागासह जागतिक बँक प्रकल्प, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, आदी संस्थांच्या अखत्यारित आहेत. रस्त्यांच्या कामासाठी पेडोको संस्थेमार्फत सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. जवळपास २७०० कोटी किंवा ३००० हजार कोटींचा डीपीआर तयार होईल. शासनाकडून निधी प्राप्त व्हावा यासाठी प्रशासन, पालकमंत्री संजय शिरसाट प्रयत्नशील आहेत. निधी प्राप्त झाल्यानंतरच रस्त्यांची कामे होतील, प्रशासकांनी नमूद केले.