मी कविता लिहिते, तेव्हा कृतीच करीत असते, माणूसपणाच्या जवळ जाण्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 02:12 PM2019-12-19T14:12:18+5:302019-12-19T14:13:29+5:30
साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केले मनोगत
- ऋचिका पालोदकर
औरंगाबाद : साहित्य अकादमीचे पुरस्कार बुधवारी दुपारी जाहीर झाले आणि कवयित्री अनुराधा पाटील यांच्या रूपाने साहित्य अकादमीच्या पुरस्कारावर पुन्हा एकदा मराठवाडी मोहोर उमटली. शांत भावनेने आणि स्थिर चित्ताने आपण पुरस्काराचा आत्मिक आनंद व्यक्त करीत आहोत, असे सांगत अनुराधातार्इंनी ‘लोकमत’शी संवाद साधला. कवयित्री म्हणून माझ्यातल्या बदलत्या जाणिवा मांडणारा ‘कदाचित अजूनही’ हा काव्यसंग्रह असून, आपण यातून सामाजिक व्यथा मांडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
‘कदाचित अजूनही’ कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ‘हजारो वर्षांपासून आपण मागतो आहोत, सुईच्या अग्रावर मावेल एवढी तरी भूमी पाय टेकवण्यापुरती, पण हरणाऱ्यांच्या बाबतीत तर इतिहासही निर्दय असतो कायम, म्हणून मी कविता लिहिते, तेव्हा कृतीच करीत असते, माणूसपणाच्या अधिकाधिक जवळ जाण्याची...’ ही कविता वाचून त्यांनी चर्चेला सुरुवात केली.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सगळ्यात पहिली भावना काय होती?
- सगळ्यात पहिल्यांदा खरेतर नवल वाटले; पण राष्ट्रीय स्वरूपाचा पुरस्कार मिळाल्याचा आत्मिक आनंद आहे. खरे तर तरुण वयात तुमच्या भावना अधिक उत्कट असतात. तुम्हाला खेचून नेणाऱ्या असतात; पण आता ज्या वयात मला पुरस्कार मिळाला आहे, त्याचा मी अत्यंत शांतपणे आणि खूप संथपणे स्वीकार करते. पुरस्कार मिळाल्यावर तुमच्या लिखाणावर परिणाम होतो किंवा लेखनाचा दर्जा बदलतो, असे अजिबात नाही. फक्त तुम्ही जे काही क ाम केले आहे, त्याचा आत्मिक आनंद देणारी ती एक पोचपावती असते. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाही. ज्यांचा राहून गेला, अशा सगळ्यांचाच तो गौरव आहे, असे मी मानते.
‘कदाचित अजूनही’ या कविता संग्रहाबाबत काय सांगाल?
- एकंदरीतच एक कवयित्री म्हणून माझ्यात जे बदल होत गेले, त्या सर्व बदलत्या जाणिवांना मांडणारा हा काव्यसंग्रह आहे. या संग्रहात स्त्रियांसंदर्भातील विविध प्रश्न आणि मानवी जगण्याबाबतचे प्रश्न मांडले आहेत. खरे तर स्त्रीवाद हा आता बदनामीचा शब्द झाला आहे. काही जणांना तो नकारात्मक वाटतो. मी स्त्रीवादी नाही; पण तरीही स्त्रियांच्या बाजूने काही कविता मांडल्या आहेत. ज्यांना काही चेहरा नाही, अशांवरही या काव्यसंग्रहातून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
‘कदाचित अजूनही’बाबत एखादा मनावर कोरलेला अनुभव?
- हे अनुभवसंचित माझे एकटीचे नसून माझ्या सभोवती असणाऱ्या समूहाचे आहे. बालमजुरांच्या अनेक समस्या, त्यांचे प्रश्न मी अगदी जवळून पाहिले आहेत. एक कवयित्री म्हणून माझे संवेदनशील मन त्याबद्दल हळहळते; पण तरीही जेव्हा या मुलांवर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबियांचा विचार मनात डोकावतो, तेव्हा त्यांची काम करण्यामागची हतबलता लक्षात येते. हळहळण्याव्यतिरिक्त आणि तुटपुंंजी मदत करण्याव्यतिरिक्त मी त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही, त्यांच्या समस्या सोडवू शकत नाही, याची खंत मला जाणवते. यातूनच ‘कदाचित अजूनही’मधील काही कविता स्फुरलेल्या आहेत.
जाहीर झालेल्या पुरस्कारांपैकी कविता संग्रहांचे प्रमाण सर्वाधिक आहे, याबाबत काय वाटते?
- कवितासंग्रहांना सर्वाधिक पुरस्कार जाहीर झाले, ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. कविता हा सार्वत्रिक आणि सर्वात जास्त लिहिला जाणारा साहित्य प्रकार आहे. मानवाची जेथून सुरुवात झाली, तेथूनच कवितेची निर्मिती झाली, असे म्हणतात.
माझ्यापेक्षाही जास्त आनंद कौतिकरावांना
माझी कविता पुढे जाण्याचे सगळे श्रेय माझ्या पतीलाच आहे. माझी कविता उभी राहिली तीच मुळात कौतिकराव ठाले पाटील यांच्यामुळे. भारतीय स्त्री म्हणून नवऱ्याला यशाचे श्रेय देत आहे, असे मुळीच नाही. नवी जोडपी ज्याप्रमाणे एकमेकांना स्पेस देतात, त्यांच्यात अभिमानाचे मुद्दे गळून पडतात, तसेच नाते आम्ही कित्येक वर्षांपासून जपले आहे. माझ्या कवितेवर काम करणे, पत्रव्यवहार बघणे ही सर्व कामे तेच करतात. या पुरस्काराचा माझ्यापेक्षाही जास्त आनंद त्यांना झाला असून, त्यांच्या बायकोचा त्यांना जो अभिमान वाटतो, त्याला तोड नाही.