छत्रपती संभाजीनगर : करोडी येथील गजानन ॲग्रो सेल्सच्या गोदामातील धान्यसाठा प्रकरणी पुरवठा विभागाने अहवाल सादर केला आहे. त्या धान्य साठ्याशी पुरवठा विभागाचा संबंध नसल्याचे स्पष्ट करीत विभागाने हात झटकले आहेत. गोदामात आढळलेला बारदाना हा खुल्या बाजारातही उपलब्ध होतो. त्यामुळे या ठिकाणी कुठलाही गैरप्रकार आढळून आला नसल्याचेही सांगत ‘क्लिन चीट’ दिली आहे.
पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी दुपारी करोडी येथील गजानन ॲग्रो सेल्सच्या गोदामावर छापा टाकला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ आणि महिला व बालविकास विभागाकडून बालक, स्तनदा माता यांच्यासाठी वितरित करण्यात येणाऱ्या एनर्जी डेन्स तूरडाळ खिचडी प्रिमिक्स, मल्टीमिक्स सिरीयल्स ॲण्ड प्रोटिन प्रिमिक्स, मिलेट बेस्ड, एनर्जी डेन्स मूगडाळ खिचडी प्रिमिक्स यांच्या सीलबंद पॅकेटचा साठा आढळून आला होता. यात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या ठिकाणी सापडलेल्या तांदूळ व इतर धान्यसाठा प्रकरणात अहवाल देण्याबाबत विविध विभागांना सांगितले होते. पोलिसांनी पुरवठा विभागावर प्रश्नांची सरबत्ती करीत अहवाल मागविला होता. त्यानुसार विभागाने अहवाल दिला आहे.
काहीही गैरप्रकार आढळला नाहीसंबंधित राईस मिलरने प्रादेशिक व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक आणि जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे यांच्याशी त्रिपक्षीय करार केला आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाकडून पुरविलेल्या धान्याची भरडाई करून तयार झालेला सी.एम.आर. तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध शासकीय धान्य गोदामात पुरवठा करण्यास अनुमती दिली आहे. त्या एजन्सीचा तांदूळ विक्रीचा खाजगी व्यवसायही आहे. तेथे काहीही गैरप्रकार दिसला नाही.- प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी.