औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल- २०१५ मध्ये होणारी निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार असून, प्रभाग रचनेच्या कामाला गती आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता मनपा निवडणुकीचे वेध राजकीय वर्तुळाला लागले आहेत. शहराची बदललेली राजकीय स्थिती आणि एमआयएमचे आगमन यामुळे पालिकेवर पकड मजबूत करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आराखडे बांधण्यास सुरुवात केली आहे. १९८८ पासून मनपावर सेना-भाजपाचे वर्चस्व आहे. वॉर्ड रचनेवरच राजकीय समीकरणांच्या गोळाबेरजेचा पाया असतो. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. २०१४ च्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना व आरक्षण करण्याची मागणी होत आहे. तसे झाल्यास १४० वॉर्डांचे ७० प्रभाग होऊ शकतात. येत्या २० दिवसांमध्ये नकाशांचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. २० ते २२ डिसेंबरपर्यंत नवीन होणाऱ्या प्रभागांची आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेच्या २०१५ च्या निवडणुका प्रभागनिहाय होणार असून, त्याला शिवसेना-भाजपा युती विरोध करणार आहे. जुन्या वॉर्डनिहाय पद्धतीनेच रचना व्हावी. यासाठी शिवसेना पुढाकार घेणार असल्याचे माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी सोमवारी स्पष्ट केले. शासन गठीत झाल्यानंतर याप्रकरणी मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ४एका वॉर्डात एकच नगरसेवक असला पाहिजे. प्रभागामुळे एकच मतदार दोनवेळा मतदान करील. हे घटनेत बसत नाही. तसेच एकाच प्रभागातून वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आल्यास त्याचा परिणाम विकासकामांवरही होऊ शकतो. त्यामुळे प्रभाग पद्धतीला शिवसेना विरोध करणार आहे. मुंबईला वॉर्ड पद्धत आहे. त्याप्रमाणे येथेही वॉर्ड पद्धत ठेवण्यासाठी पक्षाची मागणी आहे.पालिका प्रशासन सध्या विद्यमान वॉर्डांचे नकाशे तयार करीत आहे. ते काम झाल्यावर प्रभाग पद्धतीवर आक्षेप घेण्यासाठी तयार करणार असल्याचे जैस्वाल म्हणाले. १२० वॉर्ड होतील असा २०११ च्या जनगणनेनुसार अंदाज आहे. सध्या लोकसंख्या वाढली आहे. १४० वॉर्ड झाले पाहिजेत. वाढीव लोकसंख्येनुसार ओपन, ओबीसी, महिला, एस.सी.,एस.टी. अशी आरक्षणाची सोडत झाली पाहिजे. ही सोडत जुन्या पद्धतीनेच झाली पाहिजे असा शिवसेनेचा आग्रह राहील. त्यासाठी केंद्र, राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येईल.
प्रभाग आरक्षण सोडत २२ डिसेंबरपर्यंत होणार
By admin | Updated: October 28, 2014 01:02 IST