छत्रपती संभाजीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ एमआयएमने गुरुवारी सायंकाळी क्रांती चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळला, त्याला चपला मारल्या. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मेणबत्त्या पेटवण्यात आल्या. ‘काश्मिरसे आवाज आयी... हिंदू- मुस्लीम भाई भाई, मुर्दाबाद मुर्दाबाद... पाकिस्तान मुर्दाबाद, फासी दो फासी दो, आतंकवादियों को फासी दो, आयएसआय मुर्दाबाद’ अशा घोषणांनी क्रांती चौक परिसर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला.
यावेळी माध्यमांशी बोलताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी, आता भाषणबाजी बंद करून पंतप्रधानांनी थेट कारवाई करावी. त्याला एमआयएमचा पाठिंबा राहील, असे जाहीर केले. सर्वपक्षीय बैठकीस पाचपेक्षा कमी खासदार असलेल्या पक्षांना न बोलावल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ३७० कलम हटवल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटवून घेण्यातच पंतप्रधान मग्न राहिले. शेजारी चीन व पाकिस्तान काय कारस्थान रचत आहेत, याकडे त्यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
शारेक नक्षबंदी, डॉ. कुणाल खरात, समीर साजीद बिल्डर, मोहम्मद असरार, जावेद खान, जमीर कादरी, वाजेद जहागीरदार, अंकिता गजहंस, रफिक खान, जोहरा खान, ईसा खान, विकास एडके, इम्तियाज खान, मिर हिदायत अली आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.