छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे निकृष्ट काम करून वर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावणारा अंश इन्फोटेक कंपनीचा उपमहाव्यवस्थापक विशाल एडके याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले.
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पर्यवेक्षण व दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी जीव्हीपीआर कंपनीने फोरट्रेस इन्फाकॉन, यश इनोव्हेटीव्ही सोल्युशन यांना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून नेमले. या कंपन्यांकडून विशाल एडके सर्व काम पाहत होता. मात्र, वितरण व्यवस्थेच्या कामात होणाऱ्या रोड रिस्टोरेशन व पेव्हर ब्लॉकच्या कामाच्या दर्जाच्या मोजमापात मोठी तफावत आढळल्याने काम थांबविण्यात आले. हायड्रॉलिक परीक्षणाच्या आधी पाइपलाइन बुजविल्याचे समोर आल्यावर एडकेला सूचना करण्यात आली. एडकेने त्यालाही गांभीर्याने न घेता निकृष्ट काम सुरूच ठेवले.
जीव्हीपीआर कंपनीकडून दुर्लक्ष का ?काम थांबवल्यामुळे एडकेचे आर्थिक फायदे थांबले. त्यामुळे एडकेने स्थानिकांना हाताशी धरून प्राधिकरणाविरोधात तक्रारसत्र सुरू केले. मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांना खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. प्राधिकरणाने एडके विषयी जीव्हीपीआरकडे तक्रारी केल्या. कंपनीने मात्र कारवाई करण्याऐवजी दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर पलांडे यांना पोलिसांकडे तक्रार करावी लागली. प्राधिकरणाने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे एडकेला जीव्हीपीआर कंपनीने व्हर्टिकल हेड म्हणून नियुक्त केले. पोलिसांच्या माहितीनुसार, तो अंश इन्फोटेकचा उपमहाव्यवस्थापक आहे. विशालचा भाऊ विकास एडके एमआयएम पक्षाचे नगरसेवक होते.
पहिल्या गुन्ह्यातही मुख्य आरोपीएप्रिलमध्ये प्राधिकरणच्या अधिकारी, जीव्हीपीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांना ‘लक्ष्य’ केले. पलांडे यांच्यावरही हल्ला झाला. जीव्हीपीआरचे व्यवस्थापक महेंद्र गोगुलोथु यांना सचिन घोडकेने मारहाण केली. न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. त्याच्या चौकशीत गोगुलोथु यांना मारहाण करण्याचा कट एडकेनेच रचल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एकडेला त्या गुन्ह्यातही आरोपी केल्याचे उस्मानपुऱ्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले. सचिनच्या मेहुण्याकडे जलवाहिनीचे काही काम आहे. विशेष म्हणजे, आरोपी घोडके शासकीय मुद्रणालयाचा शासकीय कर्मचारी आहे.