खुलताबाद /फर्दापूर : दिवाळीच्या सुट्यांच्या पार्श्वभूमीवर वेरूळ आणि अजिंठा येथील लेण्या पर्यटकांनी फुलून गेल्या असून या गर्दीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवला आहे. अजिंठा येथे एसटी महामंडळाच्या बसने ३०० फेऱ्या मारून १ लाख ४१ हजार २७६ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. दिवाळीचा सण आणि गर्दीच्या ठिकाणी घातपात केला जाण्याची शक्यता गुप्तचर खात्याने वर्तविल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. लेणी परिसरातील पार्किंगमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून झडती घेण्यात येत आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे स्वत: लक्ष घालून आहेत. लेणी परिसरात जलद कृती दलाचे ९ जवान, गोपनीय शाखा -२, पोलीस मुख्यालयाचे गार्ड बंदोबस्त- ५ असा बंदोबस्त आहे. त्याचबरोबर पुरातत्व खात्याचे खाजगी सुरक्षारक्षक २० आहेत.दिवाळीच्या सुट्यांमुळे सध्या वेरूळ लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असून वाहनतळात वाहने लावण्यास जागा नसल्याने वाहने औरंगाबाद-धुळे महामार्गावर उभी केली जात आहे. त्यामुळे काही वेळा वाहतुकीचा खोळंबाही होत आहे.पर्यटन हंगाम सुरू झाल्याने हॉटेल, लॉज, ढाबे हाऊसफुल्ल दिसत आहेत. त्याचप्रमाणे लेणी परिसरातील हॉकर्स, फळविक्रेते, पुस्तक विक्रेत्यांचा व्यवसाय होत असल्याने व्यावसायिक जाम खुश आहेत. हा पर्यटन हंगाम व गर्दी आता जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत राहील, असे वेरूळ लेणी पोलीस चौकीचे पोहेकॉ. उंबरे यांनी सांगितले. लेणीबरोबरच बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. (वार्ताहर)१५ मिनिटांत भरते एक बसजगप्रसिद्ध अजिंठा लेणीस दिवाळीच्या सुट्यात ४५ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. यावेळी नवरात्री उत्सवाच्या वेळेस आवश्यक तेवढे पर्यटक लेणीकडे फिरकले नाहीत; परंतु दिवाळीच्या सुट्टीत मात्र पर्यटक वाढले. त्यात बच्चे कंपनी आणि इतरांनी मात्र निसर्गरम्य वातावरणात असलेले बगीचे, वाहता धबधबा यांचा जवळून आनंद घेतला.लेणीत जाणाऱ्या बससाठी रांगा लागतात. यावेळेस प्रदूषणमुक्त ९ बसेस धावत होत्या. त्यात साध्या ५ बसेस व ४ एसी बसेस होत्या. पर्यटकांची एवढी गर्दी होती, की एक बस १५ मिनिटात भरून निघून जात होती. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात भर पडली आहे. बसने दिवसभरात ३०० फेऱ्या मारत तब्बल १ लाख ४१ हजार २७६ रूपयांचे उत्पन मिळविल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे लेणीत पर्यटकांसाठी पुरातत्व विभागाने अजूनपर्यंत तरी येथे व्यवस्था केलेली नाही, त्यामुळे पर्यटकांना ताटकळत उभे राहावे लागते.
वेरूळ-अजिंठा पर्यटकांनी फुलले
By admin | Updated: October 27, 2014 00:12 IST